स्वाइन फ्लूचे 29 रुग्ण अत्यवस्थ 

स्वाइन फ्लूचे 29 रुग्ण अत्यवस्थ 

पुणे - स्वाइन फ्लूने अत्यवस्थ असलेल्या 29 रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी अशी फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

स्वाइन फ्लू आणि सामान्य फ्लू यांची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे आपण सुरवातीला ही लक्षणे असूनही डॉक्‍टरांकडे जात नाही. घरगुती औषधांवर सुरवातील अवलंबून असतो. त्यानंतरही फरक पडला नाही, तर आपण वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतो. पण या काळात स्वाइन फ्लू वाढतो. त्या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब असेल तर उपचारातील गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. सचिन गांधी यांनी सांगितले. 

महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमधून गेल्या दहा महिन्यांमध्ये स्वाइन फ्ल्यूची शक्‍यता असलेल्या 77 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 500 रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला होता. त्यातील 310 रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करून घरी सोडण्यात आले आहे. सध्या शहराच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये 89 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 60 रुग्ण हे वॉर्डमध्ये दाखल असून, उर्वरित 29 रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

शहरातील हवामानात बदल होत असल्याने स्वाइन फ्लूच्या "एच1एन1' विषाणूंचा संसर्ग वाढला आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून गेल्या काही महिन्यांमध्ये या रुग्णांची संख्या वाढत आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी गर्दीमध्ये जाऊ नये. अशी लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com