तीन डझन संत्री चक्क शंभर रुपयांत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

पुणे : पिवळ्या-केशरी रंगाच्या संत्री दिसायला मनमोहक आणि चवीला आंबट-गोड असते. त्यामुळे हे फळ पाहिल्यापाहिल्या मन प्रसन्न होते. या फळाची किंमत आपल्या आवाक्‍यात असेल तर ते फळ आपण घेतल्यावाचून राहत नाहीत. नेमकी अशीच स्थिती मार्केट यार्डातील फळ विभागात सध्या पाहायला मिळत आहे. कारण येथे शंभर रुपयांना चक्क तीन डझन संत्री मिळत आहे.

पुणे : पिवळ्या-केशरी रंगाच्या संत्री दिसायला मनमोहक आणि चवीला आंबट-गोड असते. त्यामुळे हे फळ पाहिल्यापाहिल्या मन प्रसन्न होते. या फळाची किंमत आपल्या आवाक्‍यात असेल तर ते फळ आपण घेतल्यावाचून राहत नाहीत. नेमकी अशीच स्थिती मार्केट यार्डातील फळ विभागात सध्या पाहायला मिळत आहे. कारण येथे शंभर रुपयांना चक्क तीन डझन संत्री मिळत आहे.

थंडीच्या दिवसांत अनेकांना सर्दी, खोकला होतो. संत्री खालल्याने या आजारांवर मात करता येते, असे सांगितले जाते. त्यातच बाजारात संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नागपूर, अमरावती भागातून लहान आणि मोठ्या आकाराच्या संत्र्याची जवळपास 800 पेट्यांची आवक रविवारी येथे झाली. त्यामुळे लहान आकाराची संत्री शंभर रुपयांना तीन डझन तर अकरा ते पंधरा डझन संत्री तीनशे ते सहाशे रुपयांना मिळत आहे. भाव आवाक्‍यात असल्याने ग्राहक संत्री आवर्जून घेत होते, असे चित्र पाहायला मिळाले.

व्यापारी लालचंद केसवानी म्हणाले, "संत्री खरेदीसाठी ग्राहकांची प्रतिसाद चांगला आहे. त्यातच ख्रिसमसमुळेही संत्र्यांना मागणी आहे.'' दरम्यान, मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारापाशी विदर्भातील अकरा शेतकऱ्यांची संत्री थेट ग्राहकांना विकली जात आहेत. मोठ्या आकाराची संत्री 50 रुपये डझन या भावाने मिळत आहे. यासंदर्भात शेतकरी सागर बरडे (अमरावती) म्हणाले, ""व्यापाऱ्यांना संत्री विकली तर फार फायदा होत नाही. त्यामुळे थेट विक्री केंद्रावर संत्री विकत आहोत. इथे चांगला फायदा होतो. फळे पिकविण्यासाठी आपण मेहनत घेतो तशी ती विकण्यासाठीही घ्यायला हवी, असे वाटते.''

कर्नाटक आंबा बाजारात दाखल
आंबा बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता कायमच असते. या वेळी सर्वत्र चांगला पाऊस झाला असल्याने कर्नाटकातून तोतापुरी, लालबाग आणि बदाम या आंब्याची बाजारात आतापासूनच आवक सुरू झाली आहे. त्यामुळे हंगामाआधीच आंब्याची चव चाखण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या आंब्याचा दर्जा चांगला असल्याने भावही चांगला मिळत असल्याची माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली. मार्केट यार्डातील फळ बाजारात सुमारे 7 ते 8 टन आंब्याची कर्नाटकातून आवक झाली. तोतापुरी आंब्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला 60 ते 75 रुपये भाव मिळत आहे. लालबागला 60 ते 75 तर बदाम आंब्याला 50 ते 80 रुपये भाव मिळाला. हंगाम सुरू झाल्यास आवक मोठ्या प्रमाणात राहील. त्या वेळी दरात घट होईल. फळाचा आकार, रंग आणि चव यातही फरक जाणवेल.

लक्षवेधक अंजीर अन्‌ स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाला असल्याने बाजारात लाल रंगाचे आणि आकाराला छोटे असलेले हे फळ लक्ष वेधून घेत आहे. सध्या शंभर ते चारशे रुपयांना स्ट्रॉबेरीचे क्रेट मिळत आहे. तर लहान आकाराचा बॉक्‍स 50 रुपयांपासून उपलब्ध आहे. सध्या महाबळेश्‍वर येथून स्ट्रॉबेरीची आवक सुरू आहे. डिसेंबरनंतर महाबळेश्‍वरबरोबरच वाई, सातारा भागातून ही आवक आणखी वाढेल आणि भावही उतरतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. स्ट्रॉबेरीबरोबरच अंजिरालाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. बॉक्‍समध्ये आकर्षक पॅकिंग करून अंजीर विकले जात आहेत. एका डझनाचा बॉक्‍स 60 रुपयांना मिळत आहे. सध्या सासवड, शिवापूर भागातून अंजिराची आवक सुरू आहे, असे व्यापारी विलास लवांडे यांनी सांगितले.

Web Title: 3 dozen orange santra in hundred rupees only