रेल्वे भारमानात 30 टक्के वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यानच्या मार्गावर प्रवासी आणि मालवाहतुकीत वाढ झाल्यामुळे भारमान क्षमतेपेक्षा 30 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. त्यामुळेच खंडाळा परिसरात रुळाचा तुकडा पडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. असे धोके टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाला हा वाढणारा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. या मार्गावरील तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचे काम प्रस्तावित आहे. त्यापैकी एक ट्रॅक लवकर उपलब्ध झाल्यास भार कमी होऊ शकेल. 

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लोहमार्गावर लोणावळ्यापर्यंत दोनच ट्रॅक उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे वाहतुकीत दरवर्षी वाढ होत आहे. खंडाळा परिसरात कार्यरत असणाऱ्या गॅंगमनच्या ही बाब लक्षात आल्यामुळे मुंबई-पुणे इंटरसिटी एक्‍स्प्रेसचा अपघात टळला. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणाची दुरुस्ती केली असून, या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. 

पुणे ते लोणावळा लोहमार्गावर वाढलेला भार कमी करण्यासाठी या मार्गावर उपनगरी रेल्वेसाठी प्रस्तावित असणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने या मार्गांचा तपशीलवार अहवाल तयार केला असून, तो केंद्रीय रेल्वे विभागाकडे पाठवण्यात आला आहे. दोन्ही मार्गांपैकी एका मार्गाचे काम लवकर सुरू होऊन पूर्ण झाले, तर सध्याच्या मार्गावरील भार कमी होणार आहे. 

रुळाला तडे का पडतात? 
गाड्यांच्या भारमानामुळे रुळाला तडे पडण्याचे प्रमाण 90 टक्‍क्‍यांपर्यंत 
हवामानात होणाऱ्या बदलामुळे तडे पडण्याचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपर्यंत 
रुळाला काही ठिकाणी वेल्डिंग केले जाते. त्याला बारीक तडे जातात, ते लक्षात न आल्यामुळे रुळाचा तुकडा पडतो. 
खंडाळा परिसरात पाऊस जास्त होत असल्याने रुळाच्या काही भागाला गंज चढून तडे जाऊ शकतात. 

रेल्वेच्या उपाययोजना 
भारमान वाढल्यामुळे प्रशासनाने या मार्गावरील पेट्रोलिंगमध्ये वाढ केली आहे. 
दिवसभरातून तीन ते चार वेळा या मार्गाची देखभाल करण्यात येते. 
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात रात्रीच्या वेळेत पेट्रोलिंग होते. 
पेट्रोलिंगदरम्यान ट्रॅकची स्थिती, रुळावरील प्लेट, फिश प्लेट, जोड याची बारकाईने तपासणी करण्यात येते. 

पुणे ते लोणावळा या मार्गावर रेल्वे वाहतूक वाढली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला महत्त्व देत असल्यामुळे या मार्गाची नियमितपणे देखभाल करण्यात येत असते. बऱ्याचदा देखभाल दुरुस्तीचे काम जास्त असते, त्यामुळे लोहमार्गावर ब्लॉक घेण्यात येतो. 
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

Web Title: 30 per cent increase in Railway weight gain