वर्षभरात तीन हजार कोटींची मालमत्ता ‘सील’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 जानेवारी 2019

पुणे - विविध आर्थिक गुन्ह्यात ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षभरात सुमारे ३ हजार ३९५ कोटी रुपयांची मालमत्ता ‘सील’ केली आहे. त्यामध्ये डीएसके, टेम्पल रोझ अशा काही कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या मालमत्ता अधिसूचित झाल्या असून, त्यांचा लिलाव करून गुंतवणूकदारांच्या ठेवी परत केल्या जाणार आहेत. 

पुणे - विविध आर्थिक गुन्ह्यात ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षभरात सुमारे ३ हजार ३९५ कोटी रुपयांची मालमत्ता ‘सील’ केली आहे. त्यामध्ये डीएसके, टेम्पल रोझ अशा काही कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या मालमत्ता अधिसूचित झाल्या असून, त्यांचा लिलाव करून गुंतवणूकदारांच्या ठेवी परत केल्या जाणार आहेत. 

जादा परतावा देण्याच्या किंवा जमीन, फ्लॅट, भिशीमध्ये गुंतवणूक करण्यास अनेकजण प्राधान्य देतात. त्यामध्ये बहुतांश सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. नागरिकांनी टाकलेल्या विश्‍वासाला धक्का पोचवून, संबंधित कंपन्यांकडून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. मागील काही वर्षांत अशा घटना वाढल्या होत्या. त्यादृष्टीने आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे, पोलिस निरीक्षक संजय कुरूमकर, पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने अशा कंपन्यांवर धडक कारवाई करत बड्या लोकांना अटक केली होती. 

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने संबंधित कंपन्यांच्या मालमत्ता संरक्षित करण्यावर भर दिला होता. त्यामध्ये डीएसके, सिट्रस चेक इन क्‍लब, टेम्पल रोझ, कल्याणी नागरी पतसंस्थेसह महत्त्वाच्या कंपन्यांच्या सुमारे ३ हजार ३०५ कोटी रुपयांच्या मालमत्ता आणि पावणेचार कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. संबंधित कंपन्यांच्या २२ हून अधिक बड्या आर्थिक गुन्हेगारांवर पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे रक्षण या कायद्यान्वये गुन्हे दाखल करून, त्यांच्या मालमत्ता संरक्षित केल्या आहेत. 

न्यायालयाच्या परवानगीनंतर रक्कम परत देणार
शहरातील डी. एस. कुलकर्णी, टेम्पल रोझ या वित्तीय संस्थांच्या मालमत्ता अधिसूचित झाल्या असून, सिट्रस चेक इन क्‍लब, संस्कार ग्रुप, कल्याणी नागरी पतसंस्था यासारख्या काही वित्तीय संस्था व कंपन्यांची अधिसूचित प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. टेम्पल रोझ रिअल इस्टेट या कंपनीकडून गुन्हे शाखेने तब्बल सव्वादोन कोटी रुपये जप्त केलेले आहेत. सध्या हे प्रकरण ‘एमपीआयडी’ न्यायालयात दाखल आहे. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर ठेवीदारांची रक्कम परत देण्याच्या प्रक्रियेला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्थिक गुन्हे शाखेने मागील वर्षी अनेक बड्या लोकांना अटक केली. अटक केलेल्या लोकांची साडेतीन हजार कोटी रुपयांची मालमत्ता ‘सील’ करण्यात आली आहे.  
- संजय कुरुमकर, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा

Web Title: 3000 Crore Property Seal in Last year