कोंढापुरी ग्रामस्थांच्या एकीमुळे भरले 32 माती बंधारे

नागनाथ शिंगाडे
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

कोंढापुरी (ता. शिरूर) येथे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंधारण व वृक्षसंवर्धन या उपक्रमासाठी कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशनची स्थापन केले आहे. गेल्या तीन महिन्यांत ओढा खोलीकरण व रुंदीकरणाची अनेक कामे लोकवर्गणीतून केली आहेत.

तळेगाव ढमढेरे (पुणे) : कोंढापुरी (ता. शिरूर) येथे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंधारण व वृक्षसंवर्धन या उपक्रमासाठी कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशनची स्थापन केले आहे. गेल्या तीन महिन्यांत ओढा खोलीकरण व रुंदीकरणाची अनेक कामे लोकवर्गणीतून केली आहेत.

ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील दानशूर व्यक्ती व विविध कंपन्यांकडून सुमारे 15 लाख रुपये निधी गोळा
स्वयंस्फूर्तीने गोळा करून गावच्या चारही बाजूंनी सुमारे साडेचार किलोमीटर लांबीच्या तीन ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. तीनही ओढ्यावर ग्रामस्थांनी लोकसहभागातून मातीचे 32 बंधारे बांधले आहेत. सध्या हे सर्व बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. खोलीकरण केलेल्या ओढ्याच्या कडेला हजारो झाडांची लागवड केली आहे.

ग्रामदैवत असलेल्या खंडोबा मंदिराच्या मल्हार वनराईच्या प्रशस्त प्रांगणात ग्रामविकास फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व मनरेगाचे अधीक्षक विनय आपटे यांच्या उपस्थितीत विविध प्रकारची 300 झाडांची लागवड केली आहे. या सर्व झाडांच्या संवर्धनासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी प्रत्येक झाडांना जाळी बसविण्यासाठी 2 हजार 500 रुपये दिले आहेत. त्या खर्चातून प्रत्येक झाडांच्या संरक्षणासाठी जाळी बसविण्यात आली आहे. तसेच प्रत्येक झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड, माजी सरपंच स्वप्नील गायकवाड, अर्जुन गायकवाड, नितीन गायकवाड, किरण गायकवाड, राहुल दिघे, संजय गायकवाड, संतोष गायकवाड, नाना गायकवाड, बबन गायकवाड, मधुकर गायकवाड, भास्कर गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

ऑक्‍सिजन पार्क तयार करण्याचा संकल्प
माजी सरपंच स्वप्नील गायकवाड यांनी वडील व जिल्हा बॅंकेचे माजी संचालक कै. अरुणआबा गायकवाड यांच्या स्मरणार्थ मेमोरिअल फाउंडेशनच्या माध्यमातून 75 हजार रुपये खर्च करून सुमारे 700 फूट लांबीचे तार कुंपण करून सर्व झाडांना संरक्षण दिले आहे. कुंपणाच्या फलकाचे अनावरण नुकतेच झाले. यावेळी जलसंधारणाच्या कामाला दैनिक सकाळने विशेष प्रसिद्धी देवून ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले त्याबद्दल बातमीदार नागनाथ शिंगाडे यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भविष्यात मल्हार वनराईवर ऑक्‍सिजन पार्क तयार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 Bandharas In Kondhapuri Full Of Water