पुण्यात शिल्लक राहणार 32 पोलिस ठाणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुणे - पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यामुळे पुणे शहरात आता 32 पोलिस ठाणी राहणार आहेत. जिल्ह्यातील लोणी काळभोर आणि लोणीकंद या पोलिस ठाण्यांचे कार्यक्षत्र शहर पोलिसांना जोडले जाणार आहे. मात्र, त्याबाबतची अधिसूचना अद्याप निघालेली नाही. शहर पोलिस दलातील सुमारे 1854 कर्मचारी पिंपरी चिंचवडला जोडले जाणार आहेत. 

पुणे - पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यामुळे पुणे शहरात आता 32 पोलिस ठाणी राहणार आहेत. जिल्ह्यातील लोणी काळभोर आणि लोणीकंद या पोलिस ठाण्यांचे कार्यक्षत्र शहर पोलिसांना जोडले जाणार आहे. मात्र, त्याबाबतची अधिसूचना अद्याप निघालेली नाही. शहर पोलिस दलातील सुमारे 1854 कर्मचारी पिंपरी चिंचवडला जोडले जाणार आहेत. 

शहर पोलिसांकडे या पूर्वी 39 पोलिस ठाणी होती. त्यातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी (भोसरी), वाकड, हिंजवडी, सांगवी, दिघी आणि निगडी ही नऊ पोलिस ठाणी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला जोडली गेली आहेत. त्यामुळे पुण्यात परिमंडळ एकमध्ये विश्रामबाग, फरासखाना, समर्थ, खडक, स्वारगेट, दत्तवाडी, सिंहगड आणि सहकारनगर पोलिस ठाण्यांचा समावेश आहे, तर परिमंडळ 2 मध्ये चतुःशृंगी, शिवाजीनगर, खडकी, डेक्कन, कोथरूड, वारजे माळवाडी, उत्तमनगर (खडकवासला पो. स्टे.) आणि अलंकार पोलिस ठाण्याचा समावेश करण्यात आला आहे. परिमंडळ 3 मध्ये लष्कर, वानवडी, कोरेगाव पार्क, बंडगार्डन, भारती विद्यापीठ, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, कोंढवा, तर परिमंडळ 4 मध्ये हडपसर, लोणी काळभोर, चंदननगर, मुंढवा, येरवडा, लोणीकंद, विमानतळ आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचा समावेश आहे. 

मंजूर झालेल्या रचनेत चार परिमंडळांमध्ये आठ सहायक आयुक्तांच्या नियुक्‍त्या होणार आहेत. त्यातील प्रत्येक सहायक आयुक्तांना प्रत्येकी चार पोलिस ठाण्यांच्या कामकाजावर देखरेख करावी लागणार आहे; तर अतिरिक्त आयुक्त पदांबाबत कोणताही बदल झालेला नाही. शहराचे पूर्व आणि पश्‍चिम भागाचे त्यांचे कार्यक्षेत्र असेल. दोन्ही अतिरिक्त आयुक्तांकडे प्रत्येकी दोन परिमंडळांचा कार्यभार असेल. अतिरिक्त आयुक्त गुन्हे, प्रशासन ही पदे कायम असून, सहआयुक्तांकडे कायदा व सुव्यवस्था असेल अन त्यावर आयुक्तांची देखरेख असेल. लोणी काळभोर, लोणीकंद या पोलिस ठाण्यांची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यावर शहर पोलिसांच्या कार्यक्षेत्र सोलापूर रस्त्यावर वाढणार आहे, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली. 

किमान सहा महिने 
नव्या आयुक्तालयासाठी आयुक्तांसाठी कार्यालय, प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाची जागा लागेल. तसेच शहर आणि ग्रामीण पोलिस दलातून कर्मचारी नियुक्त होणे, नव्या कर्मचाऱ्यांची भरती होणे या प्रक्रियेसाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच पोलिस महासंचालकांच्या बदल्या झाल्यावर अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या बदल्या होतील. त्यानंतर पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्तालय अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या दर्जाचे असल्यामुळे तेथील नियुक्ती होईल. त्यानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नियुक्‍त्या होतील. या नियुक्‍त्या होण्यासाठी सुमारे तीन महिने लागतील. दरम्यानच्या काळात मुख्यालयाचे कामकाज पुण्यातून चालवावे लागेल. तसेच नियंत्रण कक्षासाठी जागा शोधावी लागणार आहे. त्याशिवाय पिंपरी चिंचवड आयुक्तालयासाठी वाहनांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे पोलिस आयुक्तालय कार्यान्वित होण्यासाठी किमान सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागेल, असा अंदाज वरिष्ठ पोलिस सूत्रांनी वर्तविला. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास नवे आयुक्तालय निवडणुकीनंतर होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. 

Web Title: 32 police stations will remain in Pune