डिंभे उजव्या कालव्याला "अच्छे दिन'

नितीन बारवकर
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

शिरूर शहर व तालुक्‍याच्या मध्य भागाला वरदान ठरणाऱ्या डिंभे उजव्या कालव्याच्या गळती दुरुस्तीचे व अस्तरीकरणाचे काम तब्बल वीस वर्षांनी मार्गी लागत आहे. या कामासाठी सरकारने सुमारे 32 कोटी 57 लाख रुपयांची तरतूद केली आहे. मध्यभागातील शेतीला या कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्याचा मोठा फायदा होणार असून, शहराला पिण्यासाठीही या कालव्यातून पाणी देण्याचे नियोजन आहे.

शिरूर (पुणे) : शिरूर शहर व तालुक्‍याच्या मध्य भागाला वरदान ठरणाऱ्या डिंभे उजव्या कालव्याच्या गळती दुरुस्तीचे व अस्तरीकरणाचे काम तब्बल वीस वर्षांनी मार्गी लागत आहे. या कामासाठी सरकारने सुमारे 32 कोटी 57 लाख रुपयांची तरतूद केली आहे. मध्यभागातील शेतीला या कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्याचा मोठा फायदा होणार असून, शहराला पिण्यासाठीही या कालव्यातून पाणी देण्याचे नियोजन आहे.

आमदार बाबूराव पाचर्णे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. तीन टप्प्यात होणाऱ्या या कामांच्या स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या असून, स्वातंत्र्यदिनी किंवा त्यानंतर लगेचच या कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री महाजन यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे, असे पाचर्णे म्हणाले.

शिरूर तालुक्‍याच्या मध्यभागातून जाणाऱ्या डिंभे उजव्या कालव्याच्या कामानंतर शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाणार असून, मोठे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बारमाही पाण्याच्या उपलब्धतेमुळे, वर्षानुवर्षे दुष्काळी म्हणून ओळखला जाणाऱ्या या भागाचे बागायती क्षेत्रात रूपांतर होणार असून, "टेल टू हेड' वा "हेड टू टेल' या पद्धतीने पाणी देण्याचा वादग्रस्त विषयही निकालात निघणार आहे, असे पाचर्णे यांनी सांगितले.

कामे 20 वर्षे बंद अवस्थेत
डिंभे धरणाचा उजवा कालवा हा 150 किलोमीटर लांबीचा आहे. शिरूर तालुक्‍याच्या मध्यभागाला या कालव्याद्वारे पाणी देण्याचे नियोजन होते. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील काही मोठ्या गावांबरोबरच; आमदाबाद, अण्णापूर, निमगाव भोगी, कर्डेलवाडी, सरदवाडी, गोलेगाव व परिसरातील गावांना या कालव्यातील पाण्याचा लाभ मिळणार होता. कालवा खोदाईचे कामही झाले होते. तथापि, निधीअभावी व काही ठिकाणी भूसंपादनात आलेल्या अडथळ्यांमुळे गेल्या वीस वर्षांपासून कालव्याचे अस्तरीकरण व इतर कामे बंद अवस्थेत होती. मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली, असे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.

चासकमान कालव्याच्या संपूर्ण दुरुस्तीसाठी तब्बल 453 कोटी 62 लाख रुपये सरकारने मंजूर केले आहेत. भूसंपादनाचे विषयही या निधीतून मार्गी लावण्याचे नियोजन आहे. भूसंपादन विषय मार्गी न लागल्यास जमिनीत तीन फूट खोल वाहिन्या टाकून पाणी पुढे नेण्याचे नियोजन आहे.
बाबूराव पाचर्णे, आमदार, शिरूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32.50 Crore Section For Reparing Dimbhe Dam Right Cannel