भाजीपाल्याची आवक ३५ टक्‍क्‍यांनी मंदावली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

बाजारात आवक साधारणतः ३५ टक्‍क्‍यांनी मंदावली असून, बुधवारी बाजारात ६० गाडी भाजीपाल्याची आवक झाली.

मार्केट यार्ड - गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या धो-धो पावसामुळे शेतातून भाजीपाला काढणे अवघड होऊ लागले आहे. सततच्या पावसामुळे शेतातील भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, दुसरीकडे जो भाजीपाला काढला आहे तो मार्केट यार्डात घेऊन येण्यासाठी अनेक ठिकाणचे रस्ते बंद असल्याने आवक घटली आहे. 

बाजारात आवक साधारणतः ३५ टक्‍क्‍यांनी मंदावली असून, बुधवारी बाजारात ६० गाडी भाजीपाल्याची आवक झाली. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) मुळशी, भोर, वेल्हा, पौड या भागांतून मार्केट यार्डात भाजीपाला येतो. शहरात सततच्या पावसामुळे हातगाडीवरून भाजीपाला विक्रीस अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच, किरकोळ दुकानदारांकडेही भाजीपाला खरेदीचे प्रमाण कमी  झाली आहे. 

मार्केट यार्डात भाजीपल्याची आवक कमी आहे. आवक कमी असूनही पावसामुळे भाजीपाल्याला बाजारात उठाव नसल्याने आलेला भाजीपाला मोठ्याप्रमाणावर बाजारात शिल्लक आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर कमी झाले असल्याची माहिती अडते असोशियनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.  दुसरीकडे फळ बाजारात बहुतांश फळांचीही आवक घटली आहे. त्यामुळे कलिंगड, खरबूज, चिक्कू आणि पेरूच्या भावात वाढ झाली आहे. तर, लिंबांची मागणी घटल्याने भावात घट झाली आहे. कलिंगड आणि खरबूज प्रतिकिलोमागे प्रत्येकी दोन रुपये, चिक्कू प्रतिगोणीमागे दोनशे रुपये आणि पेरूच्या भावात वीस किलोमागे दोनशे रुपयांन वाढ झाली.

फुलांचे दरही घसरले
पावसामुळे मार्केट यार्डातील फूलबाजारात ओल्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. येणाऱ्या एकूण फुलांमध्ये तब्बल ७० टक्‍क्‍यांहून अधिक फुले ही ओली आहेत. त्यामुळे फुलांच्या भावात दहा ते वीस टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. तर, चांगल्या दर्जाच्या (सुकी) फुलांच्या भावात वाढ झाली आहे. श्रावण महिना सुरू असल्याने फुलांना मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ओल्या फुलाचा दर्जा खालावलेला असल्याने शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

भुसार बाजारालाही फटका
पावसामुळे शहरातील भुसार बाजारात माल विक्रीवर परिणाम झाला आहे. महिन्याचा पहिला आठवडा असूनही बाजारात म्हणावी तेवढी मागणी नाही. पाऊस आणि श्रावण महिना यामुळे खरेदी मंदावली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा भागात माल घेऊन जाणाऱ्या गाड्या गेल्या नसल्याची माहिती राजेंद्रकुमार बाठीया यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 per cent of incoming declined vegetables

टॅग्स