उपनगरांतील 37 जागांवर भाजपचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नगररस्ता, औंध-बालेवाडीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला हादरा

नगररस्ता, औंध-बालेवाडीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला हादरा
पुणे - महापालिकेच्या आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये ज्या भागात भारतीय जनता पक्षाला दखल घेण्याइतपतही मते मिळालेली नव्हती, त्या भागांत या निवडणुकीत भाजपला प्रचंड "बळ' मिळाले आहे. नगर रस्ता, सिंहगड रस्ता, हडपसर, औंध, बालेवाडीतील 60 पैकी तब्बल 37 जागा ताब्यात घेत भाजपने आघाडी घेतली. तर, या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसला 27 जागांवर यश मिळाले आहे. नगररस्ता, औंध-बालेवाडी या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला हादरे बसले आहे. हडपसरमधील गड राखताना राष्ट्रवादीने आपले संख्याबळ वाढविले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसची पीछेहाट झाली असून, या निवडणुकीत 16 जागा गमवाव्या लागल्या आहेत. तर, कॉंग्रेसच्या 29 जागांवरून 9 इतक्‍या घटल्या आहेत. महाराष्ट्र निर्माण सेनेला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत. नव्या प्रभाग रचनेत वाढलेल्या जागांसह अन्य राजकीय पक्षांकडील जागा हिसकावून घेण्यात भाजपला यश आले आहे. त्यात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या नगर रस्त्यावरील कळस-धानोरी, येरवडा, चंदननगर, खराडी, वडगाव शेरी या पसिरातील 24 पैकी 14 जागा भाजपने पदरात पाडून घेतल्या आहेत. या भागात राष्ट्रवादीला आठ जागा गमवाव्या लागल्या असून, या पक्षाला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. या भागात शिवसेनेची ताकद वाढली असून, शिवसेनेला तीन जागा मिळाल्या आहेत. सिंहगड रस्त्यावरील दत्तवाडी, जनता वसाहत, विठ्ठलवाडी, वडगाव, धायरी आदी भागांतील 12 जागांपैकी तब्बल 11 जागा भाजपने मिळविल्या तर एकच जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळविता आली. दुसरीकडे औंध-बाणेर-बालेवाडी येथील जुन्या रचनेतील 10 जागांपैकी दोन्ही कॉंग्रेसकडे प्रत्येकी चार तर, दोन जागा मनसेच्या ताब्यात होत्या. महापालिकेच्या नव्या प्रभागरचेनतील 8 पैकी केवळ एकच जागा राष्ट्रवादीला मिळाली असून, उर्वरित सात जागांवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.

हडपसर परिसरातील आपला बालेकिल्ला मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने बऱ्यापैकी राखला आहे. नव्या रचनेतील 24 पैकी 12 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून, एका जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवार निवडून आला आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला या भागात 11 जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत त्या 13 झाल्या आहेत. या प्रभागात भाजपला चार जागांचा फायदा झाला असून, या निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेला दोन जागा गमवाव्या लागल्या असून, दोनच जागांवर त्यांना यश मिळाले आहे. वारजे-माळवाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला चार जागांवर यश मिळाले आहे.

Web Title: 37 seats, the BJP-dominated suburb