पिंपरीत दोन ठिकाणी 38 वाहनांची तोडफोड

संदीप घिसे 
रविवार, 15 एप्रिल 2018

शनिवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून दहशत निर्माण करण्यासाठी हातात कोयते, तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या लाठ्या घेत आरडा-ओरडा करीत 38 वाहनांची तोडफोड करीत 75 हजार रुपयांचे नुकसान केले.

पिंपरी - पिंपरीतील खराळवाडी आणि बौद्धनगर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी 38 वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवत लूटमारही केली. शनिवारी घडलेल्या या दोन घटनांप्रकरणी या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 41 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

योगेश नामदेव वेताळ (वय 27, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनोद उनवणे, मन्या, आयुष्य म्हस्के, तुषार जगताप, कार्तिक वाकडे, रूपेश, चपट्या मिच्या आणि इतर 25 जण (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शनिवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून दहशत निर्माण करण्यासाठी हातात कोयते, तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या लाठ्या घेत आरडा-ओरडा करीत 38 वाहनांची तोडफोड करीत 75 हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच रस्त्याच्या कडेला असलेले दगड घर आणि दुकानांच्या काचांवर मारले. शस्त्राचा धाक दाखवत वेताळ यांच्या खिशातील दोन हजार 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील याबाबत अधिक तपास करीत आहेत. 
car and outdoor

तोडफोडीची दुसरी घटना बौद्धनगर परिसरात घडली. विकी महादेव गायकवाड (वय 25, रा., बौद्धनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल सौदे, दीपक राम, चंदर राम, प्रकाश राम, दाद्या कदम आणि इतर तीन जण (नाव पत्ता माहिती नाही) अशी दरोड्याचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून मिरवणुकीत स्पीकरच्या रॅकवर उभे राहून नाचू दिले नाही या कारणावरून आरोपींनी हातात शस्त्र घेत पाच दुचाकींची तोडफोड केली. ठिकठिकाणी लावलेले बॅनर फाडले व गायकवाड यांच्या खिशातील दोन हजार 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. सहायक निरीक्षक ठुबल याबाबत अधिक तपास करीत आहेत.

car and outdoor

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: 38 vehicles have been crushed to create terror in Pimpri Area