डोळ्यांवर आता "थ्रीडी' शस्त्रक्रिया 

eye surgery
eye surgery

पुणे- आपण "थ्रीडी' चित्रपट आवडीने पाहतो, "थ्रीडी व्हिडिओ गेम' उत्सुकतेने खेळतो. अशाच "थ्रीडी' तंत्रज्ञानाने तुमच्या नेत्रविकारांवर अचूक शस्त्रक्रिया करणे आता शक्‍य झाले आहे. सहजतेने चष्मा घालविण्यापासून ते मोतीबिंदू, काचबिंदूपर्यंतच्या गुंतागुंतीची त्रिमितीय तंत्राने केलेली राज्यातील पहिली "थ्रीडी' शस्त्रक्रिया शहरात झाली. 

थ्रीडी तंत्रज्ञान हे केवळ आता मनोरंजन आणि माहिती प्रसारित करण्यापुरते मर्यादित राहिले नाही. तर, याचा आरोग्य क्षेत्रात प्रभावी वापर रोगनिदान चाचण्यांमध्ये यापूर्वी सुरू झाला. त्यात एक पाऊल पुढे टाकत या तंत्राचा वेगवेगळ्या आव्हानात्मक शस्त्रक्रियेसाठी कुशलतेने वापरण्याचे प्रयोग करण्यात आले. त्याच्या यशस्वितेनंतर थ्रीडी तंत्रज्ञान वापरून राज्यातील पहिली डोळ्यांची शस्त्रक्रिया शहरातील राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेत (एनआयओ) मंगळवारी करण्यात आली. 

"थ्रीडी' शस्त्रक्रिया म्हणजे काय? 
शस्त्रक्रिया करताना शल्यचिकित्सकांना तो अवयव त्रिमितीय पद्धतीने टीव्हीच्या पडद्यावर दिसतो. प्रत्यक्षातील अत्यंत लहान प्रतिमान कित्येक पटीने मोठी करून अत्यंत स्पष्टपणे या "हाय डेफिनेशन टीव्ही'च्या पडद्यावर दिसते. त्यामुळे डोळ्यासारख्या अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेल्या अवयवातील सूक्ष्म रक्तवाहिन्या, अवघ्या काही मिलिमीटर जाडी असलेले पापुद्रे मोठ्या आकारात शल्यचिकित्सकांना पाहता येतात. त्या आधारावर टीव्हीच्या पडद्यावर पाहून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेला "थ्रीडी' शस्त्रक्रिया म्हणतात. 

शस्त्रक्रियेतील अचूकता वाढते 
अत्यंत सूक्ष्म, कमी जाडीचा भाग मोठ्या टीव्हीवर दिसत असल्याने शस्त्रक्रियेतील अचूकता वाढते. डोळ्याची शस्त्रक्रिया करताना यापूर्वी प्रत्यक्ष कृती आणि टीव्हीवर दिसण्यातील वेळ यात काही क्षणांचे अंतर असायचे. पण, हे अंतर "थ्रीडी'ने कमी केले आहे. डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करीत असताना त्याच क्षणाला टीव्हीच्या पडद्यावर ती कृती दिसते. 

अशी होते शस्त्रक्रिया 
"आर्टेवो 800 डिजिटल मायक्रोस्कोप'च्या माध्यमातून नेत्रपटलाची शस्त्रक्रिया करण्यात आली. "मायक्रोस्कोप'मधून संगणकाच्या मदतीने "एचडी टीव्ही'वर प्रतिमा दिसते. शस्त्रक्रिया सुरू असतानाच डोळ्याच्या बदलणाऱ्या दाबाची क्षणाक्षणाची माहिती डॉक्‍टरांना कळते. त्यामुळे डोळ्यातील सूक्ष्म पापुद्रोचे निरीक्षण करणे आता शक्‍य झाले आहे. 

डोळ्याच्या बहुतांश सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया "थ्रीडी' तंत्रज्ञानातून करणे शक्‍य होणार आहे. यामुळे शस्त्रक्रियेतील अचूकता अधिक वाढली आहे. यापूर्वी शस्त्रक्रिया करताना स्पष्ट दिसावे, यासाठी डोळ्यांवर प्रकाश टाकला जात असे. नव्या तंत्रात प्रखर प्रकाशझोत टाकण्याची गरज नसते. कारण, स्पष्टता वाढविण्याची सुविधा यातून उपलब्ध झाली आहे. 
- डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ, एनआयओ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com