जिल्ह्यात तलाव, बंधारे दुरुस्तीच्या 29 कामांसाठी 4 कोटी 21 लाख

संतोष आटोळे
गुरुवार, 3 मे 2018

सदर कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. लवकरच या कामांची सुरवात होणार आहे. याद्वारे होणाऱ्या कामांमुळे या भागातील शेकडो हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. 

शिर्सुफळ : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी तसेच भविष्यात होणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी सहा तालुक्यातील पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे गावतळे व साठवण बंधारे यांच्या दुरुस्तीच्या 29 कामांसाठी 4 कोटी 21 लाख 6 हजार रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

सदर कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. लवकरच या कामांची सुरवात होणार आहे. याद्वारे होणाऱ्या कामांमुळे या भागातील शेकडो हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. 

गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. यामुळे पावसाचे कमी झालेले प्रमाण व भूजल स्तराची घसरती पातळी विचारात घेता भविष्यात पाण्याची व चाऱ्याची टंचाई निर्मान होऊ नये म्हणून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. या माध्यमातून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून भूजल पातळी वाढविणे, सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे, यासाठी जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून पूर्वी बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पध्दतीचा बंधारे,पाझर तलाव, गावतळे, साठवण तलाव यांच्या दुरुस्तींची कामे हाती घेण्यात आली आहेत.

पाणी साठ्यासह सिंचनाखालील शेतीक्षेत्रात वाढ होईल : विश्वास देवकाते (अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे)

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या माध्यमातून जलसंधारणांच्या कामांवर विशेष लक्ष देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून छोटे पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात 4 कोटीहून अधिक निधीच्या बंधारे दुरुस्तींची कामे हाती घेण्यात आली आहे.

यामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. तसेच पाणी जमिनीत मुरल्याने भुजलपातळीसह परिसरातील विहिरी, कूपनलिका यांच्या पाणीपातळीत वाढ होईल व सिंचनाखालील शेती क्षेत्रात वाढ होईल.

Web Title: 4 crore 21 lakh for 29 works for repairing of dams in the district