चार लाखांची रोकड मालकाविनाच

महेंद्र बडदे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पुणे - गेल्या दहा वर्षांत पीएमपी प्रवासात विसरलेले एकूण सुमारे चार लाख रुपये प्रवाशांनी परत नेलेच नाहीत. उतरण्याच्या घाईगडबडीत पीएमपी बसमध्ये प्रवासी दैनंदिन वापराच्या वस्तूंप्रमाणेच पाकीट, पर्सदेखील विसरतात. या वस्तू सांभाळणे प्रशासनासाठी चिंतेची बाब झाली आहे. 

पुणे - गेल्या दहा वर्षांत पीएमपी प्रवासात विसरलेले एकूण सुमारे चार लाख रुपये प्रवाशांनी परत नेलेच नाहीत. उतरण्याच्या घाईगडबडीत पीएमपी बसमध्ये प्रवासी दैनंदिन वापराच्या वस्तूंप्रमाणेच पाकीट, पर्सदेखील विसरतात. या वस्तू सांभाळणे प्रशासनासाठी चिंतेची बाब झाली आहे. 

पीएमपीमध्ये प्रवास करताना प्रवासी घाईगडबडीत उतरतात. त्या वेळी त्यांच्याकडील वस्तू बसमध्येच विसरतात. अशा वस्तू संबंधित कंडक्‍टर, इतर प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर ते संबंधितांना त्याविषयी माहिती देतात. ती वस्तू मूळ मालकास तत्काळ मिळते. प्रवासी उतरून गेल्यानंतर कंडक्‍टर अथवा प्रवाशांच्या लक्षात आले तर त्या वस्तू स्थानक प्रमुखांकडे सोपविल्या जातात. स्थानक प्रमुखांकडून या वस्तू स्वारगेट येथील मुख्यालयात पाठविल्या जातात. तेथे या वस्तूंची नोंद केली जाते आणि संबंधित प्रवाशाने पीएमपीकडे संपर्क साधल्यानंतर ती वस्तू संबंधिताच्या मालकीची आहे, याची खात्री करूनच परत दिली जाते. गेल्या वर्षभरात सुमारे ४२१ प्रवाशांच्या वस्तू या कार्यालयात जमा झाल्या आहेत. त्यापैकी ७३ जणांनी त्यांच्या वस्तू परत नेल्या आहेत. उर्वरित वस्तू या एका खोलीत ठेवल्या असून, ही खोली आता पूर्णपणे भरली आहे. यामध्ये मोठ्या प्रवासी बॅग्ज, सॅकपासून ते छोट्या पर्स, हेल्मेट, छत्री, डबे, घड्याळ, महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या फाइल्स, पाकीट अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश आहे. 

संबंधित व्यक्तीने पीएमपीकडे संपर्क साधल्यानंतर त्याची वस्तू जमा झाली असेल, तर त्याला ती परत दिली जाते. पाकीट, पर्स विसरण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये प्रामुख्याने रोख स्वरूपाची रक्कम आढळून येते. रोख रकमेविषयी खात्री करून ती संबंधिताला परत दिली जाते. तीन महिन्यांपर्यंत स्वारगेट येथील कार्यालयात ही रक्कम ठेवली जाते. नंतर ती रक्कम बॅंकेत भरली जाते. अशा प्रकारे गेल्या दहा वर्षांत प्रवाशांनी बसमध्ये विसरलेले एकूण सुमारे चार लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. प्रतिदिवसाला एक ते दोन प्रवासी त्यांची वस्तू बसमध्ये विसरतात असे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. या वस्तूंचा दर तीन वर्षांनंतर लिलाव केला जातो.

वस्तू परत मिळविण्यासाठी काय करावे ?
 पीएमपीने अशा वस्तू परत देण्याबाबत प्रवाशांच्या सोयीसाठी २४५०३३०० हा दूरध्वनी क्रमांक राखून ठेवला आहे. प्रवाशाने या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्याचा संपर्क क्रमांक नोंदवून घेतला जातो. हरविलेल्या वस्तू आणि बसमध्ये प्रवास करण्याचा दिवस आणि वेळ याची माहिती नोंदविली जाते. ती वस्तू पीएमपीकडे जमा झाली असेल, तर त्या प्रवाशाशी संपर्क साधून त्याला ती परत दिली जाते. त्यासाठी ६० रुपये इतके शुल्क आकारले जाते. 

बांधकाम मजूर म्हणून मी काम करतो. खरेदी करण्यासाठी मी तुळशीबागेत जात होतो. तेव्हा बसमध्ये पाकीट विसरलो. त्यात सुमारे आठ हजार रुपये होते. एक दिवस अचानक माझ्या मित्राचा फोन आला, तुझे पैसे सापडले आहेत. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या पाकिटात असलेल्या एका व्हिजिटिंग कार्डवर संपर्क साधून माझा शोध घेतला. 
- सुखचंद मरावी, प्रवासी

Web Title: 4 lakh amount without owner goods