पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी चार पर्याय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी चार पर्याय पुढे आले आहेत. दरम्यान, या संदर्भात महाराष्ट्र  विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुढील महिन्यात होणाऱ्या दिशा समितीच्या बैठकीत बोलाविण्यात येणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भातील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी चार पर्याय पुढे आले आहेत. दरम्यान, या संदर्भात महाराष्ट्र  विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुढील महिन्यात होणाऱ्या दिशा समितीच्या बैठकीत बोलाविण्यात येणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भातील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

जावडेकर यांच्या उपस्थितीत सोमवारी दिशा समितीची बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुरंदर येथील विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस ‘विशेष नियोजन समिती’ म्हणून आणि २ हजार ८३२ हेक्‍टर जागा ताब्यात घेण्यास नुकतीच केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. भूसंपादनाचे काम लवकरच सुरू होणार आहे. 

राज्य सरकारने विमानतळाची हद्द निश्‍चित करून दिली आहे. प्रत्यक्षात कोणत्या जागेवर विमानतळाची उभारणी होणार आहे, हे अद्याप निश्‍चित नाही. परंतु विमानतळासाठी २२०० ते २३०० हेक्‍टर जागा अपेक्षित आहे. धावपट्टी, पार्किंग वे, टर्मिनल, कार्गो हब इत्यादीसाठी प्रत्यक्षात किती जागा लागणार यांची विचारणा डार्स कंपनीकडे केली आहे. त्यांच्याकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतर तेवढ्याच जागेचे भूसंपादन करण्यात येईल. त्यासाठी शेतकऱ्यांना द्यावयाच्या मोबदल्यासाठी संपादित कराव्या लागणाऱ्या जमिनीचे फेरमूल्यांकन सुरू झाले आहे. यापूर्वी मूल्यांकन निश्‍चित केले होते. मात्र त्यास तीन वर्षांचा कालावधी होऊन गेला. दरम्यानच्या कालावधीत रेडी-रेकनर आणि तेथील जमिनीच्या दरात मोठा फरक पडला आहे. त्यामुळे नव्याने फेरमूल्यांकन करून घेण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुरंदर तालुक्‍यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या सात गावांमध्ये विमानतळ होणार आहे.

गावनिहाय भूसंपादन होणारे क्षेत्र 
    वनपुरी : ३३९ हेक्‍टर
    उदाची वाडी : २६१ हेक्‍टर
    कुंभारवळण : ३५१ हेक्‍टर
    एखतपूर : २१७ हेक्‍टर
    मुंजवडी : १४३ हेक्‍टर
    खानवडी : ४८४ हेक्‍टर
    पारगाव : १०३७ हेक्‍टर 

भूसंपादन मोबदल्यातील पर्याय 
शेतकऱ्यांना एकरकमी मोबदला देणे
पर्यायी अकृषिक जमीन व निर्वाह भत्ता देणे
नजीकच्या शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देणे
मगरपट्टा सिटी- कोची विमानतळाच्या धर्तीवर विमानतळ विकास कंपनीमध्ये भागधारक म्हणून सहभागी करून घेणे

Web Title: 4 Option for Purandar Airport Land Acquisition