सातारा जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांवर जप्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

गाळप हंगाम 2018-19 मधील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या 63 कारखान्यांविरुद्ध आतापर्यंत महसुली प्रमाणपत्र जप्ती (आरआरसी) कारवाई केली असून, सातारा जिल्ह्यातील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी दिले. एफआरपीची रक्‍कम न दिल्यास संबंधित कारखान्यांच्या साखर आणि बगॅस विक्रीतून वसुली होणार आहे.

पुणे - गाळप हंगाम 2018-19 मधील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या 63 कारखान्यांविरुद्ध आतापर्यंत महसुली प्रमाणपत्र जप्ती (आरआरसी) कारवाई केली असून, सातारा जिल्ह्यातील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी दिले. एफआरपीची रक्‍कम न दिल्यास संबंधित कारखान्यांच्या साखर आणि बगॅस विक्रीतून वसुली होणार आहे.

आरआरसी कारवाई केलेल्या कारखान्यांमध्ये फलटण तालुक्‍यातील शरयू ऍग्रो इंडस्ट्रीज कापसी, साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्‍स, पाटण तालुक्‍यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना आणि खटाव तालुक्‍यातील ग्रीन पॉवर शुगर्स गोपुज या कारखान्यांचा समावेश आहे.

या चार कारखान्यांकडे एफआरपीपोटी सुमारे 27 कोटी थकीत रक्‍कम आहे. ती रक्‍कम वसूल करण्यासाठी कारखान्यांतील उत्पादित साखर आणि बगॅस विक्रीतून शेतकऱ्यांची थकीत देणी द्यावीत, असे आदेशात नमूद केले. या कारवाईसाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

राज्यात 2018-19 मध्ये एकूण 195 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. या कारखान्यांनी 952 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपोटी 23 हजार 293 कोटी रक्‍कम देय होती. त्यापैकी 22 हजार 915 कोटी शेतकऱ्यांना दिले आहेत.

राज्यात यंदाच्या हंगामात 139 साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्‍कम दिली आहे. अन्य 45 कारखान्यांनी 80 ते 99 टक्‍के रक्‍कम दिली आहे. एफआरपी थकविणाऱ्या 63 कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली. काही कारखान्यांकडे 397 कोटी रुपये थकीत असून, हे प्रमाण केवळ 1.71 टक्‍के आहे.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्‍त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 Sugar Factory Seized in Satara District by FRP Amount Arrears