चारशे तरुणांना शिफारसपत्रे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

पिंपरी - औद्योगिक विकासासाठी जमिनीचे भूसंपादन केलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा, म्हणून एमआयडीसीने गेल्या वर्षभरात चाकण, तळेगाव, रांजणगाव परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या ४०० मुलांना शिफारसपत्रे दिली आहेत. 

पिंपरी - औद्योगिक विकासासाठी जमिनीचे भूसंपादन केलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा, म्हणून एमआयडीसीने गेल्या वर्षभरात चाकण, तळेगाव, रांजणगाव परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या ४०० मुलांना शिफारसपत्रे दिली आहेत. 

एमआयडीसीकडून शिफारसपत्रे देताना त्यामध्ये संबंधित युवकाची शैक्षणिक अर्हता तपासून त्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे. एमआयडीसीकडून औद्योगिक विकासासाठी ज्या शेतकऱ्यांकडून जमीन घेतली जाते, त्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी येणाऱ्या कंपनीत, उद्योगात रोजगाराची संधी देण्यासाठी शिफारस पत्र देण्याचा नियम एमआयडीसीकडून करण्यात आलेल्या नियमावलीत आहे. त्यामुळे एमआयडीसीकडे येणाऱ्या अशा युवकांना शिफारसपत्र देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. 

चाकण, तळेगाव, रांजणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास झालेला आहे. या परिसरात अनेक कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प सुरू झाले आहेत. कंपन्यांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता भासत असते. त्यामुळे एमआयडीसीकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिफारसपत्रे देताना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार काम देण्यात यावे, असे नमूद करण्यात आलेले असते. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना या पत्राचा फायदा होतो.

कंपनीमध्ये कोणत्या प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे, त्यानुसार यांचा विचार होत असतो. येत्या काही दिवसांमध्ये चाकण टप्पा पाचसाठीचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तेथे येणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळविण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनादेखील या शिफारसपत्राचा लाभ घेता येईल. 

एमआयडीसीने गेल्या वर्षी चारशे जणांना अशी पत्रे दिली आहेत. यापैकी किती जणांना रोजगार मिळाला, याचा मात्र तूर्तास आकडा उपलब्ध नाही.
- संजीव देशमुख, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी 

Web Title: 400 youth Recommendation Letters MIDC