साडेचार कोटींची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

पुणे - ऑनलाइन किचनची सुविधा, पार्सलमध्ये दोघांचे पोटभर जेवण, पदार्थांचे तीस टक्के अधिक प्रमाण, परवडणाऱ्या किमती, ऑर्डर देताच केव्हाही घरपोच डिलिव्हरी यामुळे शहरात पार्सल शॉपीची उलाढाल दिवसाला पंधरा लाख रुपयांपर्यंत, तर महिन्याला चार कोटी ६५ लाखांवर जाते. फ्रोजन फूडला सर्वाधिक पसंती आहे. 

पुणे - ऑनलाइन किचनची सुविधा, पार्सलमध्ये दोघांचे पोटभर जेवण, पदार्थांचे तीस टक्के अधिक प्रमाण, परवडणाऱ्या किमती, ऑर्डर देताच केव्हाही घरपोच डिलिव्हरी यामुळे शहरात पार्सल शॉपीची उलाढाल दिवसाला पंधरा लाख रुपयांपर्यंत, तर महिन्याला चार कोटी ६५ लाखांवर जाते. फ्रोजन फूडला सर्वाधिक पसंती आहे. 

शिक्षणाकरता दरवर्षीच शहरात परगावाहून विद्यार्थी येतात. पार्सल शॉपीमध्ये सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याला बारा ते पंधरा हजार रुपये मिळतात. विशेषतः उपनगरांमध्ये पार्सलद्वारे नाश्‍ता, जेवण मागविणाऱ्यांचे दिवसाचे प्रमाण वीस ते पंचवीस टक्के आहे. विशेष म्हणजे आता ऑनलाइन ॲप उपलब्ध झाल्याने त्याद्वारेही ऑर्डर नोंदविता येते. पार्सल शॉपीद्वारेही वेगवेगळ्या हॉटेल्सला मनुष्यबळ पुरविण्यात येते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांपासून ते डिलिव्हरी बॉयपर्यंत अनेकांचे पोट या व्यवसायातून भरते. 

पोहे, उपमा, थालिपीठ, साबुदाणा खिचडी ते अगदी चायनिज फूड, पिझ्झासह फ्रोजन फूडला मागणी आहे. अडीचशेहून अधिक व्यावसायिकांनी बिर्याणी हाउस उघडली आहेत. त्यामुळे रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंतच्या पार्सल शॉपीदेखील पुण्यात आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबीयांची पसंती महाराष्ट्रीय थाळीला आहे. सणसमारंभावेळी त्याला अधिक मागणी असते; पण तरुणाईची पसंती चायनिज, पिझ्झा, सामिष भोजनाला आहे. 
पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, ‘‘ग्राहक देवो भव या संकल्पनेनुसार बहुतांश हॉटेल व्यावसायिकांनी मोफत घरपोच सेवा सुरू केली आहे. डिलिव्हरी बॉय असलेल्या विद्यार्थ्यांनाही चांगले कमिशन मिळते.’’ महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले, ‘‘पिझ्झ्यामुळे पार्सल सेवा लोकप्रिय झाली. आता पोळ्या, पराठे, पुलाव यांचे पार्सल नागरिक घेऊन जातात. हॉटेलच्या दरापेक्षा पार्सल परवडते.’’ ‘हॉटेल दुर्वांकूर’चे श्‍याम मानकर म्हणाले, ‘‘एक थाळी २६० रुपयांना असते. पार्सलचा दर तीनशे रुपये असतो. तरीही पार्सलच परवडते. कारण, एका पार्सलमध्ये दोन ते तीन जणांचे पोटभर जेवण होते. कंपन्यांकडूनही नाश्‍त्यासहित जेवणाचीही दररोज हजार ते दोन हजार पार्सलची ऑर्डर काही व्यावसायिक घेताहेत.’’

Web Title: 4.5 crore transaction in parcle shop