ग्राहकांच्या ड्रिंक्‍स अऩ् जेवणाच्या जुगाडामुळे झोमॅटो डब्यात...!

मंगेश कोळपकर
रविवार, 18 ऑगस्ट 2019

ग्राहकांना सवलत देण्याच्या नादात होत असलेले नुकसान परवडत नसल्यामुळे 'झोमॅटो गोल्ड'मधून पुण्यातील 450 हॉटेल आणि बार व्यावसायिकांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत लॉग ऑऊट केले आहे

पुणे : ग्राहकांना सवलत देण्याच्या नादात होत असलेले नुकसान परवडत नसल्यामुळे 'झोमॅटो गोल्ड'मधून पुण्यातील 450 हॉटेल आणि बार व्यावसायिकांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत लॉग ऑऊट केले आहे. भरघोस सवलत दिल्यामुळे पुण्यातील 10-15 हॉटेल्सही बंद पडली आहेत. ही संख्या वाढणार असल्याचे पुणे रेस्टॉरंट ऍन्ड हॉटेलिअर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मात्र, खवय्यांची फिप्टी पर्सेंटची सोय बुडाली आहे. 
zomato gold
झोमॅटो गोल्ड ऍपचा वापर करून हॉटेलमध्ये जाणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या बिलात तब्बल 50 टक्के सवलत देण्यात येणार होती. झोमॅटो गोल्डने तसे जाहीर केले होते. ग्राहकांनी जेवण घेतले आणि त्या सोबत ड्रिंक्‍स घेतले तर, त्यातील एका बिलात 50 टक्के सवलत दिली जाणार होती. परंतु, ग्राहकांनी ड्रिंक्‍स एका हॉटेलमध्ये आणि जेवण दुसऱ्या हॉटेलमध्ये करीत, दोन्ही ठिकाणच्या सवलतींचा लाभ घेण्यास सुरवात केली.

हॉटेल व्यावसायिकांनी झोमॅटो गोल्डला ही बाब लक्षात आणून दिली. परंतु, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून ग्राहक संख्या वाढविण्यावर भर दिला. त्यामुळे हॉटेल संघटनेने पुणे, मुंबई, बंगळूर, दिल्ली आणि गुरगावमध्ये झोमॅटो गोल्डमधून लॉग ऑऊट होण्याचे आवाहन हॉटेल व्यावसायिकांना केले आहे, अशी माहिती पुण्यातील हॉटेल संघटनेचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. तर, आम्ही हा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर असल्याची प्रतिक्रिया झोमॅटो गोल्डने ट्विटरवरून दिली

 

"ग्राहकांना वाजवी सवलत देण्यास हरकत नाही; परंतु अवाजवी सवलत दिल्यास हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडू शकते. त्यातून खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्याचाही प्रश्‍न उद्‌भवू शकतो. त्यामुळे याबाबत सारासार विचार करणे गरजेचे आहे.'' 
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशन
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 450 hotel and bar commercial logout from Zomato Gold