जिल्ह्यातील 46 हजार विद्यार्थ्यांनी दिली एमएचटी-सीईटी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

जिल्हा : परीक्षेसाठी नोंदणी केलेली विद्यार्थी संख्या 
पुणे : 47,395 
नगर : 25,545 
सोलापूर : 17,664 
सातारा : 13,736 
एकूण : 1,04,343 

पुणे - बारावीनंतर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, कृषी आणि कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी "एमएचटी-सीईटी' ही सामाईक प्रवेश परीक्षा गुरुवारी झाली. राज्यातील सुमारे चार लाख 35 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, परीक्षेचा निकाल तीन जून रोजी लागण्याची शक्‍यता आहे. जेईई मेन्सच्या धर्तीवर याही परीक्षेत काठिण्य पातळी असेल, असे राज्य तंत्रशिक्षण विभागाने यापूर्वी जाहीर केले होते, मात्र सीईटीचे पेपर म्हणावे तितके निश्‍चितच अवघड नसल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. काही विद्यार्थ्यांनी गणित आणि भौतिकशास्त्राचा पेपर अवघड गेल्याचे सांगितले. पुणे जिल्ह्यातील 46 हजार 394 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. 

ही परीक्षा राज्यातील एक हजार 260 उपकेंद्रांवर घेण्यात आली. राज्यातील चार लाख 35 हजार 606 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पुणे, नगर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील जवळपास एक लाख चार हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पुण्यात 111 उपकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली, अशी माहिती पुणे तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक डॉ. दि. रा. नंदनवार यांनी दिली. 

जेईई मेन्स, नीट या दोन्ही परीक्षांबरोबरच एमएचटी-सीईटीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही तुलनेने अधिक होती. राष्ट्रीय पातळीवरील जेईई मेन्स आणि नीट या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी सीईटीचे पेपर तुलनेने सोपे गेल्याचे सांगितले. 

जेईई मेन्सच्या धर्तीवर एमएचटी-सीईटी या परीक्षेतही काठिण्य पातळी असेल, असे तंत्रशिक्षण विभागाने यापूर्वी जाहीर केले होते. मात्र त्या तुलनेत या परीक्षेचे तिन्ही पेपर सोपे होते. आगामी काळातील कुशल अभियंते घडविण्याच्या दृष्टीने घेण्यात येणारी ही परीक्षा तुलनेने काही प्रमाणात अवघड असणे अपेक्षित आहे. सीईटीचा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी असणारा कट ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 20 गुणांनी वाढणार आहे. 
- दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र 

जेईई मेन्स आणि नीटचीही मी परीक्षा दिली आहे. सीईटीचे पेपर फार अवघड निश्‍चितच नव्हते. मला गणित हा विषय अवघड जातो. पण तरी मला त्यात 80 पेक्षा अधिक गुण मिळण्याची शक्‍यता आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रात 90 किंवा त्यापुढे गुण मिळतील, असे वाटते. एकंदर पेपर चांगले गेले. 
- साकिब खान, विद्यार्थी, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर 

Web Title: 46 thousand students of the district gave the MHT-CET