पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठीचा ४७ लाखांचा निधी व्यर्थ

pond
pond

उरुळी कांचन - तरडे (ता. हवेली) येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने मागील वर्षी ४७ लाख रुपयांचा निधी खर्च केला होता. मात्र ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हा तलाव कोरडा पडल्याने या भागातील जनावरांना व लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने मागील वर्षी वापरलेला सुमारे ४७ लाखांचा निधी व्यर्थ गेल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे.

जिल्हा परिषदेच्या लेखाशीर्ष निधीतून मागील वर्षी तरडे येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी ४७ लाख ११ हजार ८७८ रुपयांचे दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. चार महिन्यापासून सुरु असलेले काम मे २०१७ रोजी पूर्ण झाले होते. त्यानंतर झालेल्या पावसाळ्यामध्ये तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र यंदाच्या मार्च महिन्याच्या मध्यातच या तलावातील पाणी आटून गेले. या भागामध्ये शेती बरोबर मेंढी पालन हा मुख्य व्यवसाय केला जातो. मात्र तलाव आटल्याने जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. वरचे तरडे येथील शेती व जनावरांसाठी या पाझर तलावातील पाण्याचा वापर केला जातो. या पाझर तलावावर अवलंबून असलेल्या विहिरींची पातळी खालावल्याने या भागातील लोकांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.

पाझर तलावात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी 
तरडे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यासाठी पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या उभारणीवेळीच खुपटेवाडी फाट्याप्रामाणे वळती व तरडे गावाच्या पाझर तलावासाठी देखील पाणी वितरण फाट्याचे काम सुरु झाले होते. मात्र त्यावेळी पाणी वाटपाची अपूर्ण माहिती व ७-१२ उताऱ्यावरील पाणीपट्टीच्या भीतीने स्थानिक ग्रामस्थांनी या फाट्याचे काम बंद पाडले. मात्र दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईत होणारी वाढ पाहून येथील पाझर तलावामध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था व्हावी व त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी माजी उपसरपंच विठ्ठल गाढवे, नामदेव गडदे, मिलिंद गाढवे, धोंडीबा केसकर व इतर ग्रामस्थ करीत आहेत.

पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाझर तलावासाठी नव्याने जलवाहिनी टाकून मिळावी किंवा जुन्या आराखड्यातील प्रस्तावित असलेली जलवाहिनी पूर्ण करावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने कृष्णा खोरे विकास महमंडळाकडे करणार आहे.
- संगीता गडदे, सरपंच, ग्रामपंचायत तरडे.

सध्या पुरंदर उपसा सिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून त्यावेळच्या आराखड्यामध्ये तरडे येथील पाझर तलावासाठी वितरण फाटा मंजूर करण्यात आला होता तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ते काम बंद पडले होते. मात्र स्थानिक ग्रामपंचायत व लाभार्थी शेतकऱ्यांनी उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाकडे मागणी अर्ज सादर केल्यास व फाट्याची नोंद योजनेच्या आराखड्यात असल्याने बंद पडलेले काम पूर्ण होणे शक्य आहे. 
- आर. डी. भुजबळ, उपकार्यकारी अभियंता, पुरंदर उपसा सिंचन व्यव्यस्थापन उपविभाग, नाझरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com