Video : प्रवाशांनो, पुणे पिंपरी चिंचवडला जोडणारे 5 पूल वाहतूकीस खुले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मंगळवारी सकाळी सुरू झालेले पुल 
 औंध : राजीव गांधी पुल 
 औंध : जुना सांगवी पुल 
 औंध : महादजी शिंदे पुल 
 बोपोडी : भाऊ पाटील रस्त्याजवळील पुल 
 पिंपळे निलख : डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुल 

पुणे : मुळा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे सोमवारी पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना जोडणारे औंध परिसरातील चार ते पाच पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. मात्र मंगळवारी पहाटेपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी कमी झाली, त्यामुळे सर्व पुल सकाळपासून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे दोन्ही शहरामधील लाखो चाकरमान्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.

मुळा नदीच्या पाण्यामध्ये आणखी वाढ झाल्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना जोडणारे औंध परिसरातील चार ते पाच पुल वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय सोमवारी वाहतूक शाखेने घेतला होता. त्यातच औंधमधील महादजी शिंदे पुलाच्या मध्यवर्ती भागातील काही भाग खचल्यामुळे हा पुल देखील पोलिसांनी बंद केला. महत्वाचे पुल बंद झाल्याने दोन्ही शहरांमध्ये नोकरी, उद्योग, व्यवसायानिमित्त दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांची सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. बहुतांश नोकरदारांना औंधमधील राजीव गांधी पुलासह अन्य पुलांजवळूनच माघारी फिरावे लागले होते. तर काही नागरीकांना बोपोडी व बालेवाडी येथील पुलावरुन इच्छितस्थळी जाण्यास प्राधान्य दिले. मात्र त्यांना वाहतुक कोंडीचा चांगलाच सामना करावा लागला. 

दरम्यान, सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कमी झाली. त्यामुळे मंगळवारी पहाटेपासून मुळा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली. त्यानंतर औंध परिसरातील पुलांभोवती जमा झालेले पाणी ओसरले. त्यामुळे चतुःश्रृंगी वाहतुक विभागाने मंगळवारी सकाळी लवकरच औंधमधील राजीव गांधी पुल, महादजी शिंदे पुल, जुना सांगवी पुल वाहतुकीसाठी खुला केला. त्याचबरोबर पिंपळे-निलख-बाणेरला जोडणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुल व बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्याजवळील पुलही खुला करण्यात आल्याने नागरीकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 
&

"मंगळवारी सकाळी पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे औंध परिसरातील पुल वाहतुकीसाठी खुले केले आहेत. सध्या वाहतुक सुरळीत सुरू आहे.''
- प्रकाश मोरे,  सहाय्यक पोलिस निरीक्षक, चतुःश्रृंगी विभाग. 

मंगळवारी सकाळी सुरू झालेले पुल 
 औंध : राजीव गांधी पुल 
 औंध : जुना सांगवी पुल 
 औंध : महादजी शिंदे पुल 
 बोपोडी : भाऊ पाटील रस्त्याजवळील पुल 
 पिंपळे निलख : डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुल 

अद्याप बंद असलेले पुल
पुणे : बाबा भिडे पुल
पुणे : टिळक पुल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This 5 bridges connecting Pune and Pimpri Chinchwad open for transportation