पाणी योजनांसाठी जिल्ह्याला पाच कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

शेटफळगढे - सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारण कार्यक्रमाअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपाय योजनांच्या विविध स्वरूपाच्या कामावर झालेला खर्च भागविण्यासाठी जिल्ह्याला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाअंतर्गत ५ कोटी २५ लाख २६ हजार निधी मंजूर झाला आहे.  

२०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात टंचाई असलेल्या गावाच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी खोल करणे, गाळ काढणे, नवीन विंधन विहीर घेणे, हातपंप बसविणे, तात्पुरत्या स्वरूपाच्या पाणीपुरवठा योजना करणे, जुन्या योजनांची दुरुस्ती करणे, तसेच अपवादात्मक परिस्थितीत अत्यंत टंचाई भासविणाऱ्या गावांकरिता सरकारच्या मान्यतेने नवीन पाणीपुरवठा योजना राबविणे, अशा स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र ही कामे पूर्ण होऊन देखील सरकारी स्तरावरून जिल्हा परिषदेला यापूर्वी पुरेसा निधी देण्यात आला नव्हता.

मात्र आता या पूर्ण झालेल्या कामांची प्रलंबित देयके देण्यासाठी जिल्ह्याला उपलब्ध झालेला ५ कोटी २५ लाख २६ हजारांचा निधी खर्च करण्याच्या सूचना सरकारी स्तरावर देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यामार्फत हा निधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वर्ग केला जाणार आहे. टंचाई अंतर्गत सरकार स्तरावरून मंजुरी दिलेली नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे १०० टक्के पूर्ण झाल्याशिवाय उर्वरित निधी काम करणाऱ्या यंत्रणेला देऊ नये, अशा सूचना पाणीपुरवठा विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी २७ ऑगस्टच्या सरकारी निर्णयाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा परिषदेला दिल्या आहेत.

Web Title: 5 Crore for Water Scheme