औषधांच्या किमतीत पाच टक्‍क्‍यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

पुणे - तुम्हाला नियमित लागणाऱ्या औषधांवरील खर्चात या महिन्यापासून ३.४ टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. या वाढलेल्या ‘एमआरपी’वर वस्तू व सेवाकर (जीएसटी) लावून खर्चाचा हा आकडा सुमारे पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. म्हणजे तुमच्या मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या औषधांवर दरमहा होणारा तीन हजारांचा खर्च आता ३ हजार १५० रुपयांपर्यंत जाईल, अशी माहिती पुढे आली आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलपाठोपाठ आता मधुमेह, हृदयरोग, कर्करोगावरील रामबाण औषधांसह प्रभावी प्रतिजैविकांच्या किमतीत ३.४ टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्राइजिंग ॲथोरेटी’चे (एनपीपीए) सहसंचालक बलजित सिंह यांनी प्रसिद्ध केले आहे. 

का महागली औषधे?
गेल्या वर्षीच्या डब्ल्यूपीआयचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ३८९ औषधांच्या किमतीत ३.४४ टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा निर्णय ‘एनपीपीए’ने घेतला. 

‘जीएसटी’चा परिणाम
ग्राहकांना किमती बरोबरच ‘जीएसटी’ भरावा लागणार आहे. त्यामुळे ३.४ टक्‍क्‍यांपर्यंत असलेली दरवाढ पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढू शकते.

या औषधांच्या किमती वाढल्या
 जिवाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी प्रतिजैविके
 कर्करोगावर वापरण्यात येणारी वेगवेगळी औषधे
 कोलेस्ट्रॉलवर उपयुक्त औषधे
 मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करणारी औषधे
 हृदयाच्या अँजिओप्लास्टीनंतर वापरण्यात येणारे स्टेंट

मधुमेहाबरोबर उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असल्याने दर महिन्याचा औषधांचा खर्च तीन ते चार हजार रुपयांपर्यंत जातो. आता यात आणखी वाढ होणार असल्याने घरातील इतर खर्चाला कात्री लावावी लागणार आहे.
- श्रीकांत कुलकर्णी 

Web Title: 5% increase in prices of medicine