पुणे : 'रुपी'च्या पाच लाख ठेवीदारांना मिळणार दिलासा

पुणे : 'रुपी'च्या पाच लाख ठेवीदारांना मिळणार दिलासा

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत रुपी सहकारी बॅंकेचे विलीनीकरण करण्याबाबत दोन्ही बॅंकांचीही भूमिका सकारात्मक आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात रुपी बॅंकेचा आर्थिक तपासणी अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यानंतर "रुपी' आणि राज्य बॅंकेमार्फत रिझर्व्ह बॅंकेकडे एकत्रित प्रस्ताव दिला जाईल. त्यामुळे विलीनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळणार असून, "रुपी'च्या सुमारे पाच लाख ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे. 

रुपी बॅंकेवर एप्रिल 2016 मध्ये प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले. या मंडळाच्या उपाययोजनांमुळे बॅंकेची आर्थिक स्थिती सुधारत आहे; परंतु ठेवीदारांचा प्रश्‍न पूर्ण सुटलेला नाही. बॅंकेने लग्न, शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासाठी 84 हजार ठेवीदारांना 332 कोटींच्या ठेवी परत केल्या आहेत. तरीही पाच लाख ठेवीदारांना 1300 कोटींच्या ठेवी देणे बाकी आहे. ठेवीदारांना पैसे मिळण्यासोबतच बॅंकेतील आर्थिक व्यवहार पूर्ववत होण्यासाठी "रुपी'चे विलीनीकरण गरजेचे आहे. त्यासाठी "रुपी'ने राज्य बॅंकेकडे विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला होता. त्यावर राज्य बॅंकेच्या प्रशासकीय मंडळानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेनुसार "रुपी'चा आर्थिक तपासणी अहवाल तयार करणे आवश्‍यक आहे. हा अहवाल करण्यासाठी ठाण्यातील चार्टर्ड अकाउंटंट फर्मची नेमणूक केली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर "रुपी' आणि राज्य बॅंकेला रिझर्व्ह बॅंकेकडे संयुक्‍त प्रस्ताव द्यावा लागेल. त्यावर रिझर्व्ह बॅंक आणि सहकार खात्याने निर्णय घेतल्यानंतर विलीनीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे. 

विलीनीकरणानंतरचे फायदे 

- ठेवीदारांना त्यांच्या काही प्रमाणात ठेवी मिळणे शक्‍य 
- सहकारी बॅंकांवरील विश्‍वास दृढ होईल. 
- राज्य बॅंकेने छोट्या व्यावसायिकांना कर्ज देण्याबाबत नियमावलीत सुधारणा केली आहे. विलीनीकरणानंतर त्याचा लाभ रुपी बॅंकेच्या ग्राहकांना होईल. 

"रुपी'च्या विलीनीकरणाचा प्रस्ताव राज्य सहकारी बॅंकेला प्राप्त झाला आहे. त्यावर प्रशासकीय मंडळाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. विलीनीकरणाची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे. रुपी बॅंकेच्या आर्थिक तपासणीचा अहवाल जुलैअखेर प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यानंतर ठोस निर्णय घेणे शक्‍य होईल. 

- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक 

"रुपी'चे राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण व्हावे, यासाठी रुपीचे प्रशासकीय मंडळ प्रयत्नशील आहे. यामुळे ठेवीदारांना लाभ होणार असून, त्याबाबत आम्ही आशादायी आहोत; परंतु बॅंकेचे काही हितशत्रू चुकीच्या माहितीच्या आधारे बेजबाबदार विधाने करून ठेवीदारांची दिशाभूल करीत आहेत. 

- सुधीर पंडित, अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ, रुपी बॅंक 

रुपी बॅंकेच्या शाखा ः 35 
ठेवीदार ः 5 लाख 12 हजार 
ठेवीदारांना दिलेली रक्‍कम ः 332 कोटी रुपये 
ठेवी देय रक्‍कम ः 1297 कोटी रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com