मेट्रोच्या कारशेडसाठी माणमधील ५० एकर जागा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पुणे - मेट्रोच्या कारशेडसाठी माण (ता. मुळशी) येथील पन्नास एकर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. भूसंपादनाच्या मोबदल्यात तेथील शेतकऱ्यांना आर्थिक भरपाईबरोबरच म्हाळुंगे येथे होणाऱ्या नगर रचना योजनेत दहा टक्के विकसित जमिनी देण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने घेतला आहे.

मेट्रो प्रकल्प हा सार्वजनिक वाहतुकीचा व हिंजवडी येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देणारा आहे. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करून देणारा आहे. भूसंपादन करण्यात येणारी जमीन ही सुमारे दहा ते बारा शेतकऱ्यांची आहे. ती संपादित करण्यास तेथील शेतकऱ्यांनी होकार दिला आहे. त्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात येणार आहे. याशिवाय म्हाळुंगे येथे नगर रचना योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भूसंपादनात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण जमिनीच्या दहा टक्के विकसित जमिनी या नगर रचना योजनेत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘म्हाळुंगे येथील नगर रचना योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ९० टक्के शेतकऱ्यांनी या योजनेत सहगाभी होण्याची तयारी दर्शविली आहे. या योजनेतून आतापर्यंत १६ किलोमीटरची जागा रिंगरोडसाठी ताब्यात आली आहे. या योजनेबरोबरच मांजरी, फुरसुंगी आणि वडाची वाडी येथील नगर रचना योजनेचे काम हाती घेण्यात येणार आहे. पीएमआरडीएच्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचे कामदेखील सुरू आहे. लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल.’’

Web Title: 50 acres of land for Metro Carshade