#PuneIssues उद्यानांत फुलतोय खर्चाचा मळा

ज्ञानेश सावंत
सोमवार, 23 जुलै 2018

पुणे - तुम्ही ज्या उद्यानात फिरायला जाता, तेथील व्यायामाचे साहित्य, लहान मुलांची खेळणी आणि सुविधा सुस्थितीत आहेत का, या प्रश्‍नाचे उत्तर ‘नाही’ असेच असेल; पण महापालिकेच्या दप्तरी मात्र उद्यानांमध्ये नागरिकांसाठी उभारलेल्या सुविधा अत्यंत चांगल्या असल्याची नोंद आहे. त्याचे कारण म्हणजे उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वर्षाला दाखविला जाणारा खर्च...आणि तो आहे तब्बल ५० कोटी. एकीकडे उद्यानांवरील खर्चाचा मळा फुलत असताना दुसरीकडे मात्र बहुतांशी उद्यानांत दुरवस्थेचे चित्र दिसत आहे.

उद्यानांच्या देखाभाल-दुरुस्तीच्या खर्चाचे उड्डाण यंदा ५० कोटींच्या घरात पोचण्याचा अंदाज आहे. या कामांसाठी दोन वर्षांपूर्वी २५ कोटींपर्यंत खर्च केला जात होता. यंदापासून तो दुपटीने वाढविण्यात आला आहे. नवी उद्याने, उद्यानांतील नागरिकांची वर्दळ, तेथील सुविधा आणि कर्मचारी वर्गाचा खर्च वाढल्याच्या नोंदी महापालिकेच्या दप्तरी दाखविण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात सुविधा उभारण्याऐवजी उद्यानांमधील डागडुजीचे आर्थिक गणित जुळविण्याचा खटाटोप केला जात आहे. प्रभागांमधील वाढत्या नागरिकरणाच्या पार्श्‍वभूमीवर बहुतांशी नगरसेवक दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी घेऊन नवी उद्याने उभारण्याला प्राधान्य देत आहेत. नव्या उद्यानांवर एवढा खर्च केल्यानंतरही केवळ एक-दोन वर्षांत देखभालीच्या खर्चाची गणिते जुळविली जात आहेत. वास्तविक नवीन उद्यानांवर देखभाल-दुरुस्तीचा खर्च मोजकाच होणे अपेक्षित असताना केवळ दुरुस्तीच्या नावाखाली तिजोरीवर हात मारला जात आहे. यातून अधिकारी आणि नगरसेवकांचे हात ओले होत असल्याचे बोलले जात आहे.

शहर आणि उपनगरांमध्ये सध्या विविध प्रकारची १९० उद्याने आहेत. त्यात कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि पर्यावरण कार्यालयाचाही समावेश आहे. उद्यानात फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. ज्या भागांमध्ये उद्यान नाही, तेथे उभारण्याचे नियोजन आहे. मात्र जुन्या उद्यानांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याकडे लक्ष वेधताच उद्यान विभागही तत्परतेने दखल घेताना दिसतो. नियमित आणि योग्य देखभाल होत नसल्याने या कामांचा खर्च वाढत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: 50 crores a year for the maintenance of the garden