विद्यार्थी अपघात विमा योजना : वैद्यकीय खर्चापोटी 50 हजार रुपयांची मदत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

विद्यार्थ्याचे अपघाती निधन झाल्यास एक लाख रुपयांपर्यंतचे विमाकवच असेल. दोन हात-पाय किंवा हात-पाय, डोळे अपघातात गमवावे लागल्यास एक लाखाची मदत मिळेल. एक अवयव किंवा एक डोळा गमवावा लागल्यास पन्नास हजारांपर्यंत, कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास एक लाखापर्यंतची मदत मिळू शकेल. 
 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा योजनेच्या स्वरूपात आमूलाग्र बदल केले आहेत. याअंतर्गत अपघातात दुखापत झाल्यावर विद्यार्थ्यांना वैद्यकीय खर्चापोटी पन्नास हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. यापूर्वी ही मदत अवघी पाच हजार रुपये होती. 
पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळामार्फत विद्यार्थी सुरक्षा विमा योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांकडून दहा रुपये विमानिधी घेण्यात येतो. विद्यापीठाने युनायटेड इंडिया इन्शुरन्ससोबत अपघाती विमा संरक्षणासंबंधी करार केला आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यात विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्थांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होईल. 

दावा मिळविण्यात सुलभता 
विद्यार्थ्याचे अपघाती निधन झाल्यास या संदर्भात विमा रकमेकरिता दावा मिळविण्याची प्रक्रिया दमछाक करणारी होती. विमा कंपनीकडून पन्नास हजार व विद्यापीठाकडून पन्नास हजार रुपये मिळविताना होणारी दमछाक या योजनेत टळणार आहे. आता एक लाखाची विमा रक्‍कम विमा कंपनीच अदा करणार आहे. सुमारे तीन लाख 60 हजार विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत अपघाती विमाकवच उपलब्ध होईल. 

लाभ असे...
विद्यार्थ्याचे अपघाती निधन झाल्यास एक लाख रुपयांपर्यंतचे विमाकवच असेल. दोन हात-पाय किंवा हात-पाय, डोळे अपघातात गमवावे लागल्यास एक लाखाची मदत मिळेल. एक अवयव किंवा एक डोळा गमवावा लागल्यास पन्नास हजारांपर्यंत, कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास एक लाखापर्यंतची मदत मिळू शकेल. 

वैद्यकीय मदतीची रक्‍कम वाढविल्याने गरीब विद्यार्थ्यांना योजनेमुळे आर्थिक पाठबळ मिळू शकेल. योजनेतील बदल स्वागतार्ह आहेत. 
- अजिंक्‍य गिते, प्रतिनिधी, विद्यार्थी संघटना 

Web Title: 50 thousand rupees for medical expenses