'तुम्हाला जिवंत सोडत नाही'; जमीन वाटपाच्या रागातून इंदापुरात महिलेचा खून!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

'तुम्ही आम्हाला जमीन दिली नाही, तुम्हाला आता जिवंत सोडत नाही,' असे म्हणत स्वप्निलने हातातील कुऱ्हाडीने फिर्यादीची आई आशाबाई यांच्या डोक्यात घाव घातला.

इंदापूर (पुणे) : जमीन वाटपाच्या कारणावरून पंचावन्न वर्षीय महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिचा खून केल्याची घटना इंदापूरमध्ये घडली आहे. तालुक्यातील काटी या गावात २४ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. आशाबाई साहेबराव भोसले (वय ५५ वर्षे, रा. बिजलीनगर, काटी ता.इंदापूर, जि.पुणे) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

सदर महिलेचा मुलगा सचिन साहेबराव भोसले यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वप्निल उर्फ योगेश विठ्ठल भोसले, विठ्ठल महादेव भोसले, लक्ष्मी विठ्ठल भोसले (सर्व रा.काटी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Breaking: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना 'पद्मविभूषण' जाहीर!​ 

सचिन साहेबराव भोसले आणि त्यांची पत्नी शिवानी हे दोघे शेतातून मोटरसायकलवरून घरी परतले असता जमीन गट नं. ८७७ (नवीन) मध्ये झालेल्या जमिनीचे भांडण तसेच जुन्या जमीन वाटपाच्या कारणावरुन आरोपी स्वप्नील उर्फ योगेश भोसले, विठ्ठल  भोसले, लक्ष्मी भोसले हे तिघे शिवीगाळ घरात घुसले. यावेळी स्वप्निल भोसले याच्या हातात कुऱ्हाड, विठ्ठल भोसले यांच्या हातात काठी होती.

राष्ट्रपतींनी नेताजींचा नव्हे, तर अभिनेत्याच्या पोर्ट्रेटचं केलं अनावरण? खरं काय वाचा

'तुम्ही आम्हाला जमीन दिली नाही, तुम्हाला आता जिवंत सोडत नाही,' असे म्हणत स्वप्निलने हातातील कुऱ्हाडीने फिर्यादीची आई आशाबाई यांच्या डोक्यात घाव घातला. विठ्ठल याने त्याच्या हातातील काठीने आशाबाई आणि पत्नी शिवानी यांना मारहाण केली, तर लक्ष्मी भोसले यांनी दगड फेकून मारले. सदर भांडणामध्ये आशाबाई यांच्या डोक्यावर वर्मी घाव बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. यामुळेच त्या मरण पावल्या. पुढील तपास इंदापूर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 55 year old woman from Indapur was murdered out of anger over land allotment