जिल्ह्यात 550 कोटींच्या पाणी योजना रखडल्या 

जिल्ह्यात 550 कोटींच्या पाणी योजना रखडल्या 

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम आणि मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांच्या नळ पाणी योजनांची कामे रखडल्याचा आरोप सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी बुधवारी (ता. 27) झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. टंचाई आराखड्यातील पाणी योजनांच्या कामांना आचारसंहितेचा अडसर असता कामा नये. हा अडसर दूर करावा आणि ही कामे पुढे चालू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. 

आचारसंहितेमुळे रखडलेल्या पाणी योजनांना याआधीच मंजुरी दिली आहे. केवळ त्या कामांच्या निविदा प्रसिद्ध होऊ न शकल्याने सुमारे 448 पाणी योजनांची कामे भर उन्हाळ्यात आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहेत, असेही सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. प्रसंगी मुख्य सचिवांकडेही पाठपुरावा केला जाईल, असे आश्‍वासन देवकाते यांनी या वेळी सभागृहाला दिले. 

चारा छावण्या सुरू करणे, टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावयाची कामे आणि नवीन विंधनविहिरी घेणे आदी कामांना आचारसंहितेतून वगळण्यात आलेले आहे. शिवाय टंचाई निवारणाची अन्य कामे पुढे चालू ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती केलेली आहे. ही समिती आवश्‍यक कामांना निवडणूक आयोगाची परवानगी मिळविण्याचे काम करत असते. त्यानुसार पुणे जिल्हा परिषद पाठपुरावा करेल, असेही देवकाते यांनी या वेळी सांगितले. 

सर्वसाधारण सभेतील चर्चेत पांडुरंग पवार, आशा बुचके, देवराम लांडे, शरद बुट्टे पाटील, विठ्ठल आवाळे, वीरधवल जगदाळे, प्रमोद काकडे, शरद लेंडे, रणजित शिवतरे, देविदास दरेकर, अतुल देशमुख, दिलीप यादव, दिनकर धरपाळे, अमोल नलावडे आदी सदस्यांनी सहभाग घेतला. 

टंचाईची 745 कामे पूर्ण 
जिल्ह्यातील पाणीटंचाई आराखड्यातील एकूण 4 हजार 96 कामांपैकी आजअखेर 745 कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच एक हजार 286 कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. उर्वरित दोन हजार 65 कामे आचारसंहितेत अडकली असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी या वेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com