मावळात ५७ ग्रामपंचायतींची निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मावळ तालुक्‍यातील जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत पंचवार्षिक मुदत संपणाऱ्या ५७  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना व संवर्गनिहाय सदस्यसंख्या निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यातील जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत पंचवार्षिक मुदत संपणाऱ्या ५७  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना व संवर्गनिहाय सदस्यसंख्या निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तहसीलदार बर्गे व नायब तहसीलदार चाटे यांनी सांगितले की, मावळ तालुक्‍यातील ५७ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत पूर्ण होत आहे. नवलाख उंब्रे, माळेगाव बुद्रुक, खांड, कशाळ, डाहुली, वडेश्‍वर, इंगळूण, कुसवली, आढे, सोमाटणे, परंदवडी, दारुंब्रे, धामणे, ऊर्से, गहुंजे, सांगवडे, आंबी, माळवाडी, करंजगाव, साई, चिखलसे, टाकवे बुद्रुक, घोणशेत, खडकाळा, साते, कुसगाव खुर्द, नाणे, कांब्रे नामा, गोवित्री, वेहेरगाव, ताजे, मळवली, कार्ला, खांडशी, पाटण, उकसाण, शिरदे, तिकोना, कोथुर्णे, आपटी, वारू, मळवंडी ठुले, अजिवली, मोरवे, महागाव, आंबेगाव, कुरवंडे, कुसगाव बुद्रुक, येलघोळ, बऊर, पाचाणे, शिवली, थुगाव, शिवणे, आढले खुर्द, कुसगाव पमा, येळसे या ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक दृष्ट्या सर्व ग्रामपंचायतींची विशेष ग्रामसभा बोलावून प्रभाग रचना व संवर्गनिहाय (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसह) सदस्यसंख्या निश्‍चित करण्यात येत आहे. प्रभागरचना व संवर्गनिहाय सदस्यसंख्या निश्‍चित झाल्यानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 57 grampanchyat election in maval