निबुंत गावात भरदुपारी सहा लाखांची रोकड लंपास

चिंतामणी क्षीरसागर
शनिवार, 6 एप्रिल 2019

दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी मारहाण करत सहा लाख रूपयांची रक्कम पळवून नेल्याचा प्रकार घडला.

वडगाव निंबाळकर : दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी मारहाण करत सहा लाख रूपयांची रक्कम पळवून नेल्याचा प्रकार घडला. ही घटना नीरा बारामती मार्गावर निंबुत गावच्या हद्दीत काल (शुक्रवार) भरदुपारी सव्वाचारच्या दरम्यान घडला.

याबाबत जगन्नाथ दादा खोमणे रा. मुरूम ता. बारामती यांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. सुरशिंग गुलाबराव शिंदे आणि बाबुराव दत्तात्रेय कुंभार यांच्यामधे जमिनीचा व्यवहार झाला आहे. याची विसारपावतीची रक्कम सहा लाख रूपये फिर्यादीला नीरा (ता. पुरंदर) येथे दुपारी मिळाली.

बाबुराव कुंभार, रविंद्र कोरडे फिर्यादीसोबत होते. तिघेही नीरा कॉर्नवरील ढाब्यावर मद्यपान व जेवण करायला थांबले. चारच्या सुमारास मुरूम येथे आपल्या घरी जाण्यासाठी तिघेही दोन दुचाकीवरून निघाले रविंद्र कोरडेच्या दुचाकीवर फिर्यादी पैशांची पिशवी घेऊन बसले. कुंभार यांची दुचाकी पुढे गेली. काही अंतर गेल्यावर फरांदेनगरजवळ केवड्याचा ओढ्याजवळ चढावरून जाताना पाठीमागून एका दुचाकीवरून तीन तरूण आले.

जवळ गाडी घेऊन एकाने रविंद्र कोरडे यांच्या कपाळावर काहीतरी मारले. यामुळे गाडीचा तोल गेला. वेग कमी होताच खोमणे यांच्या हातातील पिशवी हिसकावत तिघांनी बारामती बाजूला पळ काढला. आरडा-ओरडा केल्यानंतर रस्त्याने जाणारे लोक थांबले. ओळखीच्या लोकांनी जवळील वाघळवाडी येथील खाजगी दवाखान्यात कोरडे यांना दाखल केले. पोलिसांनी अज्ञात तीन तरूणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 6 Lakhs Theft in Nibunt