पुणे महापालिकेचे चहापानावर ६० लाख

पुणे  महापालिकेचे चहापानावर ६० लाख

पुणे - महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी-नगरसेवकांनी कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवण्याचे फर्मान सोडल्याने सगळ्याच दालनांत ‘चाय पे चर्चा’ रंगत आहे. या पाहुणचाराचा मागील वर्षातील खर्च ६० लाख रुपये आहे. यात स्थायी समितीने आघाडी घेतली असून, वर्षभरात सात लाख रुपयांचा चहा पाजला आहे.  

चहापानाचा हा खर्च पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या दालनातील आहे. सर्वसाधारण सभा, स्थायी समिती, उत्सवानिमित्त घेतलेल्या बैठकांमधील पाहुणचारासाठी झालेला खर्च निराळाच आहे. त्याच्या हिशेबाचा ताळमेळ ताळमेळ घालणे शक्‍य नसल्याचे नगरसचिव कार्यालयाकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या मुख्य इमारतीत नागरिकांशी संबंधित महत्त्वाचे २२ विभाग आहेत. त्यामुळे या इमारतीत रोज ८ ते १० हजार जणांची वर्दळ असते. त्यात पदाधिकारी-नगरसेवकांचे नातेवाईक, कार्यकर्ते, ठेकेदार आणि एजंटांचा भरणा अधिक असतो. 

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांत कामे होत असल्याने सामान्य नागरिक फारसे मुख्य इमारतीत येत नाहीत. परिणामी, पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत रोज ठराविक मंडळींचा राबता असतो. या सगळ्यांचा रोज तेवढ्याच अदबीने पाहुणचार होतो. त्यामुळेच चहापानावरील खर्चाचे आकडे फुगत आहेत. चहापान पुरविण्यात महापालिकेतील अधिकारीही मागे नाहीत. तेही कामानिमित्त येणाऱ्यांचा आवर्जून पाहुणचार करत असल्याचे त्यांनी केलेल्या खर्चावरून समोर आले आहे.

महापौर, स्थायी समितीसह सत्ताधारी व विरोधी पक्षांचे पदाधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चहापानासाठी वर्षाकाठी ठराविक रक्कम दिली जाते. अर्थसंकल्पातही त्याची तरतूद केली जाते. ही सेवा पुरविणाऱ्यांना महिन्याकाठी बिले दिली जाते. त्याला नगरसचिव आणि अतिरिक्त आयुक्तांची मंजुरी आवश्‍यक असते. त्यानंतर बिले दिली जातात. मात्र काही समित्यांसाठीचा निधी कमी पडत असल्याने आयत्यावेळी तो वाढवून घेण्यात आला आहे.

ठेकेदार नेमण्याला विरोध 
पदाधिकारी-अधिकाऱ्यांकडे होणाऱ्या चहा-खानपान सेवेच्या खर्चाचा तपशील पाहून तत्कालीन अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी आक्षेप घेतले होते. त्यांच्याकडे मंजुरीसाठी आलेल्या बिलांत खाद्यपदार्थांच्या किमती जादा लावल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर नगरसचिव कार्यालयांतील अधिकाऱ्यांची कानउघाडणी करीत त्यांनी या सेवेसाठी निविदा काढून ठेकेदार नेमण्याच्या हालचाली केल्या होत्या. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीला दोष देत पदाधिकाऱ्यांनी ते होऊ दिले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com