योजनेचे ६३ लाख ‘पाण्यात’

योजनेचे ६३ लाख ‘पाण्यात’

पुणे - गावाला आणि वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथे उभारलेल्या नळ पाणी योजनेत गैरप्रकार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या योजनेसाठी खर्च केलेले ६३ लाख रुपये अक्षरशः पाण्यात गेले आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या योजनेतून गावकऱ्यांना एक थेंबही पाणी पिण्यासाठी उपलब्ध होऊ शकलेले नाही.

ही योजना पूर्णपणे अयशस्वी ठरली असून, यास जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन दोन कार्यकारी अभियंते, खेड पंचायत समितीचे दोन उपअभियंते, एक शाखा अभियंता, ग्रामसेवक आदी अधिकाऱ्यांसह ग्राम पाणीपुरवठा समितीचे अघ्यक्ष, सचिव, सरपंच आदी जबाबदार असल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे. मात्र, या प्रकरणी दोषी आढळलेल्या एकाही अधिकारी व पदाधिकाऱ्यावर अद्याप कारवाई झालेली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. 

दरम्यान, चौकशीत दोषी आढळलेले अभियंते सध्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीत कार्यरत नसल्याने, त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार सरकारचा आहे. त्यामुळे या अभियंत्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे; तसेच तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला पत्र देण्यात आले आहे. या वृत्ताला जिल्हा परिषदेतूनही दुजोरा देण्यात आला.

या योजनेबाबतची तक्रार कोरेगाव खुर्दच्या ग्रामस्थांनी थेट राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. लोणीकर यांनी या योजनेच्या कामाचा दर्जा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गुणवत्ता परीक्षण व दक्षता पथकामार्फत करण्याचा आदेश दिला होता. पथकाच्या अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे यांनी ही तपासणी करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला आहे. 

गुणवत्ता तपासणी झालेली पहिलीच योजना
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गुणवत्ता परीक्षण व दक्षता पथकाकडून दर्जा तपासून अहवाल मिळविण्यासाठी संबंधित योजनेसाठी प्रस्तावित खर्चाच्या १ टक्का रक्कम तपासणी करून घेणाऱ्या संस्थेने भरणे अनिवार्य असते. त्यामुळे या पथकाकडून तपासणी करून घेण्यास फार कोणी पुढे येत नाही; परंतु जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी दौलत देसाई यांनी ही रक्कम जिल्हा परिषदेच्या वतीने भरली. अशी रक्कम भरून पाणी योजनेच्या गुणवत्तेची तपासणी करणारे हे राज्यातील पहिलेच उदाहरण ठरले आहे. 

चौकशी अहवालातील प्रमुख आक्षेप
 पाणी साठवण टाक्‍या प्रस्तावित क्षमतेपेक्षा लहान
 टाक्‍यांमधून मोठ्या प्रमाणात गळती
 पाइपलाइन अनेक ठिकाणी जमिनीवरच उघडी
 लोखंडी पाइपऐवजी पीव्हीसी पाइपचा वापर
 ग्रामस्थांकडून पाणीपट्टी भरण्यात येत असल्याबाबतचे बोगस रेकॉर्ड
 गावात एकाही कुटुंबाला वैयक्तिक नळजोड नाही, तरीही त्याबाबतच्या बोगस नोंदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com