पुण्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ६५ रुग्ण; ८०% शहर होणार 'सील'!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

नगर रस्त्यांवरचा बहुतांशी भाग, हडपसर, कात्रज, धनकवडीतील काही परिसर 'सील' होण्याची शक्‍यता आहे.

पुणे : पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता.16) झपाट्याने वाढला असून, दिवसभरात नव्या 65 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या 442 झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिवसभरात चौघांचा मृत्यू झाल्याने ही संख्या 42 पर्यंत पोचली आहे. त्याचवेळी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही महापालिकेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश असून एका 38 वर्षाच्या महिलाचा बळी गेला आहे. मृत पावलेल्या चौघांनाही उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. 

मृतांमध्ये गंज पेठेतील 54 वर्षाच्या पुरुषाचा समावेश असून, त्याला 13 एप्रिलला दवाखान्यात दाखल केले होते.त्यानंतर गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. कोंढव्यातील 47 वर्षाच्या महिलेला घशाचा त्रास होत असल्याने नऊ एप्रिलला रुग्णालयात नेले होते. त्यांना कोरोना झाल्याचे निदान होताच त्यांच्यावर उपचार केले गेले; मात्र त्यांचाही मृत्यू झाला. गुलटेकडी येथील 38 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला असून,तिला उच्चरक्तदाब होता.

आणखी वाचा - जपानमध्ये होऊ शकतो पाच लाख लोकांचा मृत्यू!

पुणे विभागात कोरोना बाधित एकूण 518 रुग्ण

विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 518 वर पोचल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात एकूण 518 कोरोना बाधित रुग्ण असून, एकूण 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 463 बाधित रुग्ण त्यापैकी 42 रुग्णाना घरी सोडण्यात आले आहेत. तसेच, 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 12 बाधित रुग्ण आढळून आले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 26 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 25 रुग्णांला घरी सोडण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हयात 6 बाधित रुग्ण आहेत.

- लॉकडाऊन शिथिल होणार; राज्य सरकारच्या आदेशाकडे आता लक्ष!

पुणे विभागात 6 हजार 781 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 6 हजार 383 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर, 398 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 518 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

पुणे शहरात 120 फ्ल्यू क्लिनिक सुरू  

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये 120 फ्ल्यू क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे महापालिका क्षेत्रात 73 क्लिनिक तर, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 47 क्लिनिक आहेत. नागरिकांनी ताप, सर्दी यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ फ्ल्यू क्लिनिकमध्ये उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

- 'त्या' बालिकेसाठी सुप्रिया सुळेंनी शोधली देशभरात औषधे

80 टक्के शहर होणार सील

पुण्यात कोरोनाचा आवाका वाढू लागल्याने आणखी काही भाग 'सील करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. विशेषत: पूर्व भाग म्हणजे, नगर रस्त्यांवरचा बहुतांशी भाग, हडपसर, कात्रज, धनकवडीतील काही परिसर 'सील' होण्याची शक्‍यता आहे. मात्र, परिसरात निश्‍चित झाला असून, पोलिसांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. 

दरम्यान, शहरातील नव्याने काही भाग 'सील' केल्यास 80 टक्के शहरातील प्रवेश बंद राहणार आहेत. मात्र, पोलिसांची यंत्रणा लक्षात घेऊन पुढची पावले उचलली जाणार आहेत. 
पुणे शहारातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, तो आकडा गुरुवारी सायंकाळपर्यंत 442 इतका झाला आहे. दिवसभरात म्हणजे, गुरुवारी नवे 65 रुग्ण आढळून आले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न म्हणून नव्याने काही भाग 'सील' केला जाणार आहे, असेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 65 Coronavirus patients found in one day in Pune