अरेरे...अंगणवाडी नव्हे, हा तर कोंडवाडा! 

anganvadi
anganvadi

केडगाव (पुणे) : केडगाव स्टेशन (ता. दौंड) येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. 200 चौरस फुटांच्या एका खोलीत दोन अंगणवाड्यांचे 65 चिमुकले कसेबसे बसत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ही परिस्थिती आहे. 

केडगाव स्टेशन परिसरातील चिमुकल्यांसाठी येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन रिकाम्या खोलीत दोन अंगणवाड्या भरत होत्या. गेल्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद शाळेचा एक वर्ग वाढल्याने अंगणवाडीची एक खोली कमी झाली. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून एका खोलीत 65 विद्यार्थी कोंबल्यासारखी स्थिती आहे. 

या 65 विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे धान्य मोठ्या प्रमाणात मिळते. ते आल्यानंतर अर्धी खोली धान्याने भरते. जागेच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना नीट शिकवता येत नाही. या विद्यार्थ्यांना शौचालयाची व्यवस्था नाही. ते उघड्यावर शौचाला जातात. वर्षापूर्वी सुरू झालेले शौचालयाचे काम सध्या बंद अवस्थेत आहे. या बांधकामाचा राडारोडा अंगणवाडीपुढे पडलेला आहे. याचाही त्रास या चिमुकल्यांना भोगावा लागत आहे. 

केडगाव ग्रामपंचायत कार्यालयापासून 20 फूट अंतरावर ही अंगणवाडी भरते. या 20 फूट अंतरात वापरात नसलेली पडकी विहीर व तीन ते चार फुटांचे गवत वाढले आहे. या गवतातील सरपटणारे प्राणी कधी कधी अंगणवाडीच्या खोलीत येतात. पण, या प्रकाराकडे कोणाचे लक्ष नाही. 

याबाबत केडगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली, तर जागेची अडचण आहे, मोजणी प्रस्तावीत आहे, प्रयत्न चालू आहेत, थोड्या दिवसांत होईल, अशी ढोबळ उत्तरे दिली जात आहेत. तसेच, ग्रामपंचायतची तहकुब ग्रामसभा शुक्रवारी (ता. 20) होती. अंगणवाडीच्या शिक्षिका प्रमिला कुंभार यांनी ग्रामसभेत गाऱ्हाणी मांडली. पण, त्यांची गाऱ्हाणी ना पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली, ना ग्रामस्थांनी. "सकाळ'च्या प्रस्तुत प्रतिनिधीने अंगणवाडीला भेट दिली. त्या वेळी कुंभार यांनी अडचणींचा पाढाच वाचला. 

मोठं घर अन्‌ पोकळ वासा! 
दौंड तालुक्‍यातील श्रीमंत ग्रामपंचायतींमध्ये केडगावचा समावेश आहे. ग्रामपंचायतीला घरपट्टीतून मिळणारे उत्पन्न सुमारे 72 लाख रुपयांचे आहे. केडगावला जागेचे दर अवाक्‍याबाहेरचे असले, तरी ग्रामपंचायतीची ताकदही मोठी आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देताना ग्रामपंचायतीने हात आखडता घेऊ नये, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नितीन कुतवळ यांनी केली आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com