सात देशांचा उद्यापासून पुण्यात लष्करी सराव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 सप्टेंबर 2018

पुणे - दहशतवाद ही जगाची डोकेदुखी बनली आहे. त्या विरोधात संयुक्त लढा ही संकल्पना समोर ठेवत जगातील सात राष्ट्रे सोमवारपासून (ता. १०) पुण्यात एकत्र येणार आहेत, ती लष्करी सरावासाठी. औंधमध्ये आठवडाभर हा सराव चालणार आहे. 

पुणे - दहशतवाद ही जगाची डोकेदुखी बनली आहे. त्या विरोधात संयुक्त लढा ही संकल्पना समोर ठेवत जगातील सात राष्ट्रे सोमवारपासून (ता. १०) पुण्यात एकत्र येणार आहेत, ती लष्करी सरावासाठी. औंधमध्ये आठवडाभर हा सराव चालणार आहे. 

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘पुण्यात अनेक राष्ट्रांचा होणारा हा पहिलाच लष्करी सराव आहे. पुण्याचे सामरिक महत्त्व अधिक वाढणार आहे. यात भारतासह, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान, थायलंड व श्रीलंका हे देश सहभागी होणार आहेत. औंध येथे १० ते १६ सप्टेंबर या काळात ‘मिलेक्‍स : १८’ हा लष्करी सराव होईल. त्यासाठी सात राष्ट्रांचे लष्करप्रमुख उपस्थित राहणार आहेत.’’ बिमस्टेक (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्‍टरल टेक्‍निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन) अंतर्गत हा सराव होणार आहे. यात सहभागी होणाऱ्या राष्ट्रांसमोरील समस्यांबाबत लष्करप्रमुखांमध्ये चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

बिमस्टेक संघटना कशासाठी?
बिमस्टेक या संघटनेची ६ जून १९९७ रोजी बॅंकॉक येथे स्थापना झाली. त्या वेळी भारत, बांगलादेश, थायलंड आणि श्रीलंका हे देश संघटनेचे सदस्य होते. त्यानंतर म्यानमार, भूतान व नेपाळ या देशांना सदस्यत्व दिले. विविध क्षेत्रात परस्परांना सहकार्य करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. आता दहशतवादाला विरोध याचाही समावेश केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 Country Army Training in Pune