पीएमपीच्या ताफ्यात 70 नव्या बस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात 70 मिडी बस दाखल झाल्या असून, शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध मार्गांवर त्या धावू लागल्या आहेत. उर्वरित 100 बस महिनाअखेरीस पीएमपीकडे येतील. दरम्यान, मार्गावर 1440 बस धावत असल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले. 

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात 70 मिडी बस दाखल झाल्या असून, शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध मार्गांवर त्या धावू लागल्या आहेत. उर्वरित 100 बस महिनाअखेरीस पीएमपीकडे येतील. दरम्यान, मार्गावर 1440 बस धावत असल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले. 

पुुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2 वर्षांपूर्वी दिलेल्या निधीतून 200 मिडी बस घेण्यात आल्या आहेत. शहराच्या मध्यभागात आणि अरुंद रस्त्यांवर त्या सोडण्यात येतील. त्यातील 30 बस 7 मार्च रोजी पीएमपीच्या ताफ्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात 70 बस सोमवारी (ता. 9 एप्रिल) पीएमपीमध्ये दाखल झाल्या. आता उर्वरित 100 बस महिनाअखेरीस दाखल होणार असल्याचे पीएमपीने स्पष्ट केले. मिडी बसमधील 30 बस महिला स्पेशलसाठी सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे नियमित प्रवाशांसाठी आता 70 बस उपलब्ध आहेत. पिंपरी, स्वारगेट, कोथरूड, निगडी, भोसरी, हडपसर आदी मोठ्या आगारांमध्ये या बसचे प्रवाशांच्या संख्येनुसार वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारपासून या बस मार्गावर धावण्यास प्रारंभ झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जीपीस, आयटीएमस यंत्रणा 
दाखल झालेल्या बसमध्ये जीपीएस आणि आयटीएमस यंत्रणा आहे. त्यामुळे मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून त्यांच्यावर देखरेख करण्यात येत आहे, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पीएमपीच्या 1000 बस तर भाडेतत्त्वावरील सुमारे 450 बस, अशा सरासरी 1440-50 बस मार्गावर धावत आहेत, तर एक कोटी 47 लाख रुपये रोजचे सरासरी उत्पन्न आहे. 

सोमवारी 5893 फेऱ्या रद्द 
कंत्राटदारांच्या सुमारे 200 बस मार्गावर धावत नसल्याचे उघड झाले आहे. त्या जास्त संख्येने मार्गावर येतील, यासाठी संबंधित कंत्राटदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच बस वेळेत मार्गावर धावल्या नाहीत, तर दंडात्मक कारवाईचीही तरतूद करारात आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. पीएमपीच्या 524 बस सोमवारी रद्द झाल्या. त्यामुळे सुमारे 5893 फेऱ्या झाल्या नाहीत, अशी माहिती पीएमपीच्या संकेतस्थळावर मंगळवारी प्रसिद्ध झाल्याचे पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे यांनी निदर्शनास आणले. 

काही बसचालक आयटीएमएसशी संबंधित यंत्रणेत लॉगइन करीत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ऑनलाइन यंत्रणेवर बसची संख्या कमी असल्याचे दिसून येते. परंतु, याबाबत संबंधित चालकांना आदेश देण्यात आले आहेत. मार्गावर सध्या 1440 बस धावत आहेत. 
टी. एस. माने, वाहतूक महाव्यवस्थापक, पीएमपी 

पीएमपीचे प्रवासी घटले 
पीएमपीची सरासरी प्रवासी संख्या सध्या दहा लाखांच्या खाली पोचली आहे. तुकाराम मुंढे पीएमपीच्या अध्यक्षपदावर असताना प्रवासी संख्या सुमारे 11 लाख 50 हजारांवर पोचली होती. बस संख्या वाढत असताना प्रवासी संख्या 15 लाख गाठण्याचे उद्दिष्ट पीएमपीने ठेवले आहे; परंतु सध्या प्रवासी संख्या 9 लाख 26 हजार आहे. याबाबत विचारणा केली असता, परीक्षा सुरू आहेत; तसेच पासधारकांचेही प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रवासी संख्या घटल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Web Title: 70 new buses in PMP