esakal | पुण्यातील 7 हजार रुग्णांना समुपदेशानातून मिळाला आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Counseling

पुण्यातील 7 हजार रुग्णांना समुपदेशानातून मिळाला आधार

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : घरातील सर्वांना कोरोना झाल्याचे समजताच पायाखालची वाळूच सरकली होती. गृहविलगीकरणात असताना अचानक फोन येतो आणि त्यातील आश्वासक शब्दांनी कोरोनाशी दोन हात करायला बळ मिळाले....या भावना आहेत पुण्यातील अनेक कोरोनाग्रस्तांच्या. सुमारे ७ हजार कोरोनाग्रस्तांना जनकल्याण समितीच्या भारत विकास परिषदेने ‘आरोग्य मित्र’ योजनेतंर्गत आधार दिला.

कोरोना झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना धीर देण्याची गरज असल्याचे जनकल्याण समितीच्या लक्षात आले. यासाठी डॉ. अनंतभूषण रानडे, डॉ. स्वप्नील कुलकर्णी, डॉ. पराग सहस्त्रबुद्धे तसेच भारत विकास परिषदेचे श्रीनिवास कुलकर्णी, समर्थ भारतचे अभय ठकार, संजय कुलकर्णी यांची एक बैठक झाली आणि आरोग्य मित्र योजना तयार झाली. त्यानुसार कोरोनाग्रस्तांना किंवा त्यांच्या नातेवाईकांचे फोनवर समुपदेशन करण्यात आले. त्यात महापालिकेनेही सहाय्य केले. समुपदेशनासाठी फोन करण्यासाठी सोशल मिडियातून आवाहन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी भारतीय वंशाचे युक्रेन, स्वित्झर्लंड, युरोपातून काही जणांनी फोनद्वारे समुपदेशन करण्याची तयारी दर्शविली. शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्त्यांनी नोंद केली. नोंद झालेल्या कार्यकर्त्यांना समुपदेशक स्मिता कुलकर्णी व अन्य प्रशिक्षकांमार्फत ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले.

हेही वाचा: पुणे : अकरा दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात

भारत विकास परिषदेच्यावतीने सावरकर भवन येथे वॉररुम तयार करण्यात आली होती. या ठिकाणी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले. महानगर पालिकेकडून कोरोनाग्रस्तांची रोजची यादी आली की, तिचे शहराच्या भागानुसार वर्गीकरण केले जायचे आणि समुपदेशकांच्या टीमकडे ती पाठवली जायची. त्या टीमकडून संबंधित कोरोनाग्रस्त अथवा त्यांच्या नातेवाईकांना फोन करण्यात येत होते. सुमारे ३८९ समुपदेशकांनी कोरोना रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.

''रुग्णसंख्या मोठी असल्याने समुपदेश करणे आव्हान होते. रुग्णाची, त्याच्या नातेवाइकांची मानसिक अवस्था लक्षात घेणे आवश्यक होते. यासाठी गृहविलगीकरण म्हणजे काय यासाठी काही व्हिडीओ तयार केले होते. ते संबंधितांना पाठविण्याची व्यवस्था केली होती. रुग्णांच्या शंका, समस्या जाणून प्रसंगी डॉक्टरी सल्लाही दिला जात होता. फोन केलेल्या रुग्णांनी, नातेवाइकांनी या आरोग्यमित्र योजनेबद्दल समाधान व्यक्त करत कोरोनाशी लढण्याचे बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली.''

- संजय कुलकर्णी,समन्वयक, आरोग्य मित्र प्रकल्प

हेही वाचा: टु व्हिलर घेताय? आता नंबर प्लेटसाठी No Waiting

काय होती रुग्णांची तक्रार?

 • भीती वाटणे

 • काळजी वाटणे

 • एकटेपणा जाणवणे

 • दोषी वाटणे

 • राग, संताप येतो

 • चिडचिड होणे

 • उदास, निराश वाटणे

काय दिला सल्ला?

 • सुयोग्य प्रमाणात झोप, आहार घ्या. व्यायाम दररोज करा.

 • छंद जोपासा

 • कपड्यांचे कपाट आवरा.

 • लहान मुलांशी गप्पा मारा

 • आपल्या भावना लिहून ठेवा

 • नवीन कौशल्य आत्मसात करा

loading image