५४ किलोमीटरमध्ये तब्बल ७४ गतिरोधक

गणेश बोरुडे
सोमवार, 23 जुलै 2018

तळेगाव दाभाडे - प्रत्येक पाऊण किलोमीटरला असलेल्या गतिरोधकांमुळे वाढलेले अपघात आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने ‘गतिरोधकांचा मार्ग’ म्हणून ख्याती पावलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

तळेगाव दाभाडे - प्रत्येक पाऊण किलोमीटरला असलेल्या गतिरोधकांमुळे वाढलेले अपघात आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने ‘गतिरोधकांचा मार्ग’ म्हणून ख्याती पावलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

पूर्वीचा राज्य मार्ग क्रमांक ५५ आणि नव्याने मंजुरी मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी दररोज शेकडो वाहनांच्या रहदारीने ओसंडून वाहत असतो. तळेगाव, चाकण, शिक्रापूर या गावांसह नव्याने विकसित झालेल्या तळेगाव-चाकण औद्योगिक वसाहतीमुळे अपघातही मोठ्या प्रमाणावर वाढले. मात्र, गेल्या दशकभरात या महामार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरण न करता अपघातांवर मलमपट्टी म्हणून तात्पुरत्या उपयोजना करण्यात आल्या. धोकादायक वळणे, साइडपट्ट्यांची दुरवस्था आणि अपघात रोखण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण न करता गतिरोधक टाकून वाहनांचा वेग मंदावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभागाने केल्याचे दिसते.

तळेगावपासून शिक्रापूरपर्यंत टाकलेले गतिरोधक पार करताना चालकांच्या अंगावर काटा येतो. तळेगाव ते चाकणमध्ये ३१ तर चाकण ते शिक्रापूरदरम्यान ४३ असे ५४ किलोमीटर अंतरामध्ये एकूण ७४ गतिरोधक असलेला मार्ग आहे. सरासरी पाऊण किलोमीटरला एक गतिरोधक अशी स्थिती आहे. पुण्याबाहेरून मुंबईकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असला,तरी गतिरोधकांमुळे वाहनांचा वेग मंदावून, हे अंतर पार करण्यासाठी सरासरीपेक्षा दुप्पट वेळ लागतो. माळवाडी, इंदोरी, देहूफाटा, खालुंब्रे, रासे-भोसे, बहुळ, चौफुला आदी ठिकाणच्या गतिरोधकांवर पुढचे वाहन अचानक थांबल्यानंतर मागील वाहने धडकून आजवर अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. हे गतिरोधक कुठलाही नियम अथवा मानांकनाला अनुसरून नसल्याने दुचाकी, चारचाकी वाहने आदळून प्रवाशांची हाडे खिळखिळी होतात. अवजड वाहतुकीमुळे बहुतेक गतिरोधक खराब झाले असून, तुरळक ठिकाणी गतिरोधकांची सूचना देणारे फलक आहेत. नवख्या चालकांना गतिरोधकांचा अंदाज न आल्याने वाहने आदळून अथवा घसरून अपघात होत आहेत. नुकतीच या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता मिळाली. मात्र, प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार याची माहिती नाही. तोपर्यंत या धोकादायक गतिरोधकांची प्रमाणात, मानांकनाप्रमाणे दुरुस्ती व्हावी. साइडपट्ट्यांची कामे करून, गतिरोधकांची सूचना देणारे इशारा फलक लावून चालकांचे येणे-जाणे सुसह्य करावे, अशी मागणी होत आहे.

डांबरीकरणादरम्यान दुभाजकांची डागडुजी करून, पांढरे पट्टे मारण्याचे नियोजन आहे. आर्थिक तरतूद नसल्यामुळे फलक लावणे शक्‍य नाही.
- मनोहर अतवाडकर, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग

Web Title: 74 Speed Breaker in 54 kilometers