शहरात ८० टक्के विद्यार्थ्यांना लस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे - शहरातील ८० टक्के विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली असून, उर्वरित मुलांपर्यंत पोचण्यासाठी यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. त्याअंतर्गत काही शाळांमधून लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीचेही आयोजन केले आहे. 

पुणे - शहरातील ८० टक्के विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली असून, उर्वरित मुलांपर्यंत पोचण्यासाठी यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. त्याअंतर्गत काही शाळांमधून लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीचेही आयोजन केले आहे. 

देशातून सुरवातीला देवा आणि त्यानंतर पोलिओ या रोगांचे निर्मूलन करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता लहान मुलांमध्ये गोवर आणि रुबेला या रोगांना हद्दपार करण्यासाठी राज्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहिमेला सुरवात झाली आहे. त्यातून महापालिकेसह मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांनी याला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात शहरातील ८० टक्के विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली आहे. काही उर्दू शाळा वगळता इतर शाळांमध्ये चांगला प्रतिसाद असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य खात्याने नोंदविले आहे.   महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. अमित शहा म्हणाले, ‘‘शहरातील वेगवेगळ्या शाळांमधून रोजच्या रोज लसीकरण सुरू आहे. शहरातील बहुतांश शाळांमधून ९० ते ९५ टक्के विद्यार्थ्यांनी ही लस घेतली आहे.’’

लसीकरणाच्या सुरवातीला काही मुलांना चक्कर, उलट्या आणि मळमळ असा त्रास झाला होता. पण, नंतर या त्रासाचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्दिष्टपूर्तीकडे...
 लसीकरणाचे एकूण लक्ष्य - ६ लाख ५५ हजार ६९२
 आतापर्यंत झालेले लसीकरण - ५ लाख २५ हजार ९२०

शहरातील लसीकरणाला शाळांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ८० टक्के लक्ष्य पूर्ण करता आले. या लसीकरणाचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे. त्यात शंभरापेक्षा जास्त शाळांमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण राहिलेले असल्यास तेथे वैद्यकीय पथक जाऊन लस देणार आहेत. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमधूनही हे लसीकरण केले जात आहे.
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

Web Title: 80 percent of students in the city get vaccinations