आणखी ८० हजार सायकली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

पुणे - खासगी संस्थांच्या सहभागातून एकात्मिक सायकल योजनेत पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत शहरात सुमारे ८० हजार सायकली उपलब्ध करून देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत सध्या चार हजार सायकली उपलब्ध आहेत. 

पुणे - खासगी संस्थांच्या सहभागातून एकात्मिक सायकल योजनेत पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत शहरात सुमारे ८० हजार सायकली उपलब्ध करून देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत सध्या चार हजार सायकली उपलब्ध आहेत. 

शहरातील वाहतूकव्यवस्था सुधारणे, प्रदूषण कमी करणे, वाहतूक यंत्रणेत बदल घडविण्याच्या हेतूने दोन वर्षांपूर्वी महापालिकेने सायकल योजना तयार केली होती. त्यास गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात योजनेचे काम सुरू झाले. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने यास निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरात सायकल ट्रॅक उभाण्यासाठी पाणीपुरवठा, पथ या विभागांशी समन्वय साधून कामे करावी लागत आहेत. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता (गोखले रस्ता) या रस्त्यांवर सायकल ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे. शहरांतील इतर काही रस्त्यांवर सायकल ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे. 

सायकलींची संख्या वाढविण्यासाठी खासगी संस्थांचा सहभाग घेतला जात आहे. हिरव्या, पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या सायकल सध्या उपलब्ध केल्या जात आहेत. याकरिता चार संस्था पुढे आल्या असून, या संस्थांनी सायकलींची संख्या मार्च २०१९ पर्यंत ८० हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महापालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात या योजनेसाठी ५५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

योजनेचा आराखडा 
 सायकलकरिता स्वतंत्र ट्रॅक करणे 
 सायकली उपलब्ध करून देणे 
 सायकल शेअरिंगची यंत्रणा उभारणे
 सायकल वॉर्डन नियुक्त करणे 
 सायकल पार्किंगकरिता जागा उपलब्ध करणे 
 योजना चार वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित

सायकलींची संख्या
४,००० - सध्या उपलब्ध
८०,००० - पुढील वर्षी मार्चपर्यंत
८०० किलोमीटर - शहरातील सायकल ट्रॅकची लांबी 

महापालिकेच्या योजनेत सध्या चार हजार सायकल उपलब्ध असून, त्याची संख्या वाढणार आहे. सध्या एका सायकलचा दिवसातून चार ते पाच वेळा वापर होत आहे. सायकल ट्रॅक वाढत जातील तसा सायकलींचा वापर वाढेल. 
- श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता, प्रकल्प

Web Title: 80000 cycle available in pune city