नाझरे धरण 83 टक्के भरले

तानाजी झगडे
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने कऱ्हा नदीला चांगले पाणी वाहत आहे. नाझरे धरण 83 टक्के भरले असून, चार-पाच दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्‍यता आहे.

जेजुरी (पुणे) : नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने कऱ्हा नदीला चांगले पाणी वाहत आहे. नाझरे धरण 83 टक्के भरले असून, चार-पाच दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्‍यता आहे.

नाझरे धरणाची पाणी साठवण क्षमता 788 दशलक्ष घनफूट एवढी आहे. कऱ्हा नदीला सध्या चांगले पाणी वाहत आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढत आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार धरणात सध्या 650.65 दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा तयार झाला आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी 77 टक्के एवढी आहे.

एक जूनपासून नाझरे धरण परिसरात सुमारे 470 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षीच्या सरासरी एवढा पाऊस आताच झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने साधारण चार-पाच दिवसांत धरण पूर्ण भरून वाहण्याची शक्‍यता आहे. साधारण सात वर्षांनंतर प्रथमच धरण भरून वाहणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी आमदार अशोक टेकवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे यांनी धरणाची पाहणी केली. परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याचे त्यांनी सांगितले. नाझरे धरणावर सुमारे पन्नास गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. याशिवाय जेजुरी औद्योगिक वसाहत, जेजुरी शहराला या धरणातून पाणी पुरविले जाते. त्यामुळे पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भाग व बारामती तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 83 % Water Stock In Nazare Dam