बारामतीचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिरास 840 वर्षे पूर्ण

मिलिंद संगई
सोमवार, 18 जून 2018

बारामती (पुणे) : बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर मंदिरास नुकतीच 840 वर्षे पूर्ण झाली. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे. 

बारामती (पुणे) : बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर मंदिरास नुकतीच 840 वर्षे पूर्ण झाली. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे. 

इ.स.पूर्व 1137 मध्ये राज रामदेवराव यादव यांनी या मंदिराच्या उभारणीचे काम हाती घेतले, चाळीस वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महादेवाचे श्री सिध्देश्वर मंदिर साकारले. अखंड लिंग व अखंड दगडातील अत्यंत सुंदर नंदी हे या मंदीराचे वैशिष्टय. नंदीचे सर्व दागिनेही दगडातच कोरलेले आहेत, समोरुन नंदीकडे पाहिले तर त्याचा एक कान तुमच म्हणण ऐकतो आणि दुसरा कान महादेवाकडे आहे, जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यंत पोहोचविण्याचे कामच तो करतो असा भास होतो. 

या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्त लिंग होते व एक पाण्याच्या टाकीची सोय आहे. गुप्त लिंग आता तेथून काढून ठेवण्यात आले आहे, मात्र त्या काळातही वास्तूकला किती आधुनिक होती हे मंदीराकडे पाहिल्यावर जाणवते. 

औरंगजेबाच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्याकडे हे मंदिर होते. त्या नंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली. तेव्हापासून दाते कुटुंबिय आजतागायत सिध्देश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात.

सन 1723  मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांनी मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवली होती, जी आजही उपलब्ध आहे. त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे. संत ज्ञानेश्वर या मंदीरात नेहमी येत असत. त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली, त्यांच्या हातांचे व बोटांचे ठसे असलेला एकमेव दगड या मंदीरात आजही आहे. संत तुकाराम महाराजांचेही वास्तव्य येथे होते, या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामींनी या मंदीराच्या आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचे वास्तव्य याच मंदीरात असे. 

मंदिराची वैभवशाली परंपरा...
बारामतीचे श्री सिध्देश्वर मंदीर ही वैभवशाली ऐतिहासिक परंपरा आहे, याचे जतन करण्याचा आम्ही प्रयत्न सातत्याने करतो. सर्वांची यात आम्हाला साथ मिळते आहे.
- समीर दाते, मुख्य विश्वस्त, श्री सिध्देश्वर मंदीर, बारामती. 
 

Web Title: 840 years completed to siddheshwar temple baramati