जिल्ह्यातील ८९९ गावे ‘चंदेरी’

ज्ञानेश्वर रायते
बुधवार, 26 डिसेंबर 2018

भवानीनगर - हत्तीपाय, टायफॉईड, कॉलरासारखे जलजन्य आजार आता जवळपास दुरापास्त झाले आहेत. मात्र, गॅस्ट्रो, अतिसार, हगवणीसारख्या आजारांनाही पुणे जिल्ह्याने दूर ठेवले आहे. त्यामुळेच या वर्षात झालेल्या आरोग्य मूल्यांकनात जिल्ह्यातील १४१२ ग्रामपंचायतींमध्ये जलजन्य आजारच झाला नाही. तसेच, ८९९ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सलग पाच वर्षे जलजन्य आजारच झाला नाही. त्यामुळे ही सर्व गावे आरोग्य विभागाच्या चंदेरी कार्डसाठी पात्र ठरली आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्‍यातील ११५ पैकी ६३ गावे समाविष्ट आहेत.

जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रवीण माने व पाणी व गुणवत्ता संनियंत्रण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांनी याची घोषणा केली. ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण झाले नाही, तर जलजन्य आजार होतात. मागील दशकापर्यंत एवढेच नाही, तर मागील पाच वर्षांपर्यंत जलजन्य आजाराची साथ अनेक गावात आलेली पाहायला मिळायची.

मात्र, मध्यंतरीच्या काळात आरोग्य खात्याच्या सक्षम यंत्रणेमुळे व आरोग्यसेवकांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे अनेक गावांना जलजन्य आजार शिवला नाही. लोकांमध्ये आरोग्याबाबत झालेली जनजागृती, त्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नातून हे यश मिळाले असल्याचे मानले जात आहे. यामध्ये सलग पाच वर्षे जलजन्य आजार न झालेल्या किंवा तसा रुग्ण न आढळलेल्या गावांना चंदेरी कार्ड दिले जाते.

चंदेरी कार्ड पटकावणारी तब्बल ८९९ गावे या वर्षी ठरली आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्याची जिल्हा परिषद ही राज्यातील सर्वांत कार्यक्षम आरोग्य खाते असलेली जिल्हा परिषद असल्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत हे आणखी एक सकारात्मक पाऊल जिल्हा परिषदेने टाकले आहे.

राज्यातील सर्वांत कार्यक्षम आरोग्य खाते पुणे जिल्ह्यात आहे, हेच यातून दिसते. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व अधिकारी यांनी दिलेले पाठबळ व गावातील आरोग्य सेवक, ग्रामसेवक व जलसुरक्षा सेवकांनी केलेल्या कामातून हे यश मिळालेले आहे. कोणताही पाण्याचा आजार जिल्ह्यात झालेला नाही, हे अत्यंत सुखद आहे. सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या योगदानातून हे यश गाठले आहे. यात सातत्य राखण्याची गरज आहे. गावे रोगराईमुक्त ठेवता येतात, हा त्यातून एक चांगला धडा मिळालेला आहे. 
- प्रवीण माने, सभापती, आरोग्य समिती, जिल्हा परिषद

Web Title: 899 Village Health