राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 90 कोटी अनुदान

undavadi
undavadi

उंडवडी - ''राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधासाठी सरकार 30 दिवसाला 90 कोटी रुपये अनुदान देत आहे. मात्र हे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सरकारने संबधित दूध संघ, दूध संकलन केंद्राकडून दुधाची आकडेवारी मागविली आहे. दोन दिवसापूर्वी दुधाच्या अनुदानाचा 90 कोटीचा हप्ता सोडण्यात आला आहे. ज्या दूध संघाने अॅपमध्ये माहिती भरून दिली आहे. त्याना ही अनुदानाची रक्कम मिळणार आहे.'' असे प्रतिपादन  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी उंडवडी सुपे ( ता. बारामती ) येथे केले.  

बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील उंडवडी कडेपठार, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, अंजनगाव, कऱ्हावागज, आदी गावांचा दुष्काळी परिस्थितीची पाहणी व आढावा घेण्यासाठी जानकर यांनी दौरा केला. यावेळी उंडवडी सुपे येथे झालेल्या सभेत ते शेतकऱ्यांना माहिती देताना बोलत होते. 

याप्रसंगी भाजपचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे,  दिलीप खैरे, ज्ञानेश्वर कौले, तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, बापूराव सोनवलकर, विष्णू चव्हाण, अमोर सातकर,  सरपंच एकनाथ जगताप, विनायक गवळी, रंजना गवळी,  अंजना गवळी,  रेणूका गवळी, मंगल गवळी, ग्रामसेवक विनोद आटोळे यांच्यासह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

जानकर पुढे म्हणाले, '' दूध संघानी सरकारच्या अॅपमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती व दूध संकलानाची माहिती भरायची आहे. यामुळे कोणत्या गावातून किती दूध संकलित होते याची माहिती सरकारला मिळणार आहे. तसेच  दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणेही शक्य होणार आहे.  शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान कोणी लाठू नये, यासाठी सरकारकडून विशेष काळजी घेतली जात आहे. 

अनुदान शेतकऱ्यांनाच मिळावे, दुसरे कोणी अनुदान लाठले तर यामध्ये सरकार बदनाम होईल. यामुळे या कामाला वेळ लागत आहे. सरकारकडे पैसा कमी नाही,  राज्य सरकार तोटा सहन करून शेतकऱ्यांना दुधाला प्रती लिटरला 25 रुपये दर देत आहे.  हा दर शेतकऱ्यांना मिळत नसेल तर त्यांनी आपल्या दूध संघाकडे जावून संबधित अधिकाऱ्याला अॅपमध्ये माहिती भरण्यास सांगावे. जर तसे नाही झाले तर मला फोन करुन कळवावे. मी लक्ष घालेन.

जनावरांना चारा मिळावा, यासाठी आम्ही वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. आम्ही चारा छावणी करणार नाही. यामध्ये स्थानिक नेते भ्रष्टाचार करण्याची शक्यता असते.  त्यामुळे आम्ही थेठ चाऱ्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करू किंवा गावातील महिला बचत गटामार्फत चारा वाटप करणार आहोत. 

यामुळे राज्यातील 96 हजार महिला बचत गटांना  रोजगार मिळेल.  दुष्काळी भागातील जनावरांना पिण्याचे पाणी मिळावे. यासाठी टॅंकरची संख्या  वाढविण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. दुष्काळाचे कोणीही राजकारण करू नये.  या भागासाठी शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंधीस्त पाईपलाईन मधून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. म्हणजे  या भागाचा कायमस्वरुपी पाण्याचा प्रश्न मिटेल.''   

अधिकाऱ्यांना जानकरानी फटकारले....
उंडवडी सुपे येथील दौरा आणि कोपरा सभा संपल्यानंतर मंत्री जानकर आपल्या गाडीत बसण्यासाठी निघाले होते. यावेळी एका कार्यकर्त्याने 

त्यांना येथील पशुसंवर्धनच्या दवाखान्याचे उद्या अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन असल्याचे सांगितले. यामुळे जानकर गाडीत बसयाचे थांबले आणि पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून म्हणाले, पशुसंवर्धन मंत्री मी आहे की अजित पवार आहे ? ..त्यावर अधिकारी म्हणाले तुम्ही आहात .  मग जानकर म्हणाले, उद्या पशुसंवर्धनच्या दवाखान्याचे उद्घाटन करायचे नाही. मला किंवा पालकमंत्री गिरीष बापट यांना विचारल्याशिवाय अजिबात उद्घाटन करायचे नाही. अशी तंबी देवून फटकारले. त्यामुळे उद्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उंडवडी सुपे येथील पशुसंवर्धन विभागाच्या  दवाखान्याचे उद्घाटन होणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com