निवडणूक कामासाठी हव्यात 900 बस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणूक मतदानाच्या दरम्यान दोन्ही महापालिकांनी पीएमपीकडे सुमारे 900 बस मागितल्या आहेत. सुमारे 60 टक्के बस निवडणुकीच्या कामात दोन दिवस गुंतल्यास प्रवाशांना कसे सामोरे जायचे, असा प्रश्‍न पीएमपी प्रशासनाला पडला आहे.

पुणे - महापालिका निवडणूक मतदानाच्या दरम्यान दोन्ही महापालिकांनी पीएमपीकडे सुमारे 900 बस मागितल्या आहेत. सुमारे 60 टक्के बस निवडणुकीच्या कामात दोन दिवस गुंतल्यास प्रवाशांना कसे सामोरे जायचे, असा प्रश्‍न पीएमपी प्रशासनाला पडला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या साहित्य वाटपाला 20 फेब्रुवारीपासूनच सुरवात होईल. पुण्यात सुमारे 4 हजार, तर पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे अडीच हजार मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रात इलेट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) पोचविणे, कर्मचाऱ्यांची ने-आण करणे आदींसाठी पुणे महापालिकेने 600, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने 280 बसची मागणी पीएमपीकडे केली आहे. 

या दोन्ही शहरांत सध्या पीएमपीच्या सुमारे 1450-1500 बस रस्त्यावर धावतात. त्यातील 900 बस निवडणूक कामांसाठी दोन दिवस दिल्यास प्रवाशांचे हाल होतील आणि पीएमपीचा डोलाराच कोसळून पडेल, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. परंतु, निवडणूक आयोगाच्या आदेशाला नाही म्हणता येत नसल्यामुळे पीएमपीने पर्यायी मार्ग शोधण्यास प्रारंभ केला आहे. 

200 बस सुरू करणार 
पीएमपीच्या विविध आगारांत सध्या सुमारे 400 बस बंद स्थितीत असून, त्यातील 200 बस सुरू होऊ शकतात. मात्र, त्यासाठी पुरेसे सुटे भाग आणि कुशल मनुष्यबळ लागणार आहे. पीएमपीने सर्व आगारप्रमुखांना त्या-त्या आगारातील बंद बस तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आदेश दिला आहे. तसेच भाडेतत्त्वावर आणखी 100- 150 बस तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध होऊ शकतील का, याबाबतही प्रशासन तयारी करीत आहे. 

मोठा आर्थिक तोटाही 
पीएमपीला प्रतिबस प्रतिदिन सुमारे 12 हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यानुसार दोन्ही महापालिकांना पीएमपीने दोन दिवसांसाठी 10 हजार रुपये प्रतिबस प्रतिदिन भाडे सांगितले आहे. दोन्ही महापालिकांना पीएमपीने मागितलेला निधी दिला, तरी प्रतिदिन प्रतिबस दोन हजार रुपये तोटा येणार आहे.

Web Title: 900 bus should work for the election