विधान परिषदेसाठी 94 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

शिवसेनेने पाळला "युती'चा धर्म; मनसेचा बहिष्कार
पुणे - विधान परिषदेच्या पुणे मतदारसंघात शहर आणि जिल्ह्यात शनिवारी सुमारे 94.27 टक्के मतदान झाले. पुणे महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करीत आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. शिवसेनेने "युती'चा धर्म पाळला; तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. पिंपरी- चिंचवडमध्ये पक्षाचा "व्हीप' डावलून मतदान झाले. येत्या मंगळवारी (ता.22) मतमोजणी होईल.

पुणे मतदारसंघातील एका जागेसाठी शहर आणि जिल्ह्यात शनिवारी मतदान झाले. शहरांमध्ये दोन्ही महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्ह्यात नऊ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. या निवडणुकीत 698 पैकी 658 मतदारांनी आपला हक्क बजावला.

या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल भोसले, कॉंग्रेसचे संजय जगताप, भारतीय जनता पक्षाचे अशोक येनपुरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विलास लांडे (तांत्रिकदृष्ट्या अर्ज भागे घेता आला नाही) रिंगणात होते. उमेदवारी अर्ज कायम राहिला तरी, लांडे यांनी भोसले यांना पाठिंबा जाहीर केला होता.

पुणे महापालिकेतील कॅप्टन वडके सभागृहात सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली. भोसले यांच्या पत्नी रेश्‍मा यांनी पहिले मतदान केले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी मतदान केले. त्यापाठोपाठ कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक मतदानासाठी सभागृहात आले. मतदान होईपर्यंत महापालिकेतील सभागृह नेत्यांपासून सर्वच राजकीय पक्षांचे गटनेते ठाण मांडून होते. सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत 658 मतदारांनी मतदान केले. त्यात 321 महिला आणि 358 पुरुष मतदारांचा समावेश आहे.

मनसेचे गटनेते ठाण मांडून
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार या पक्षाच्या नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. या निवडणुकीत मतदान न करण्याबाबत पक्षाने "व्हीप'ही काढला होता. मात्र, "व्हीप' डावलून मनसेचे नगरसेवक मतदान करण्याच्या शक्‍यतेमुळे महापालिकेतील मनसेचे गटनेते किशोर शिंदे, वसंत मोरे, बाबू वागस्कर यांच्यासह पक्षाचे नगरसेवक वडके सभागृहाच्या बाहेर सकाळपासूनच ठाण मांडून होते. शिवाय, महापालिकेच्या आवारात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयासाठी 330 मतांची गरज
या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला 330 मतांची गरज असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या मंगळवारी शिवाजीनगर येथील शासकीय गोदामात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात होईल. खेड, मावळ, भोर आणि पुरंदरमध्ये शंभर टक्के मतदान झाल्याचेही राव यांनी स्पष्ट केले.

Web Title: 94% percent voting for vidhan parishad