आरटीओची 95 टक्के कामे एका क्‍लिकवर

अनंत काकडे
रविवार, 25 मार्च 2018

चिखली : वाहन परवान्यांच्या ऑनलाइन अपॉइंटमेंट पाठोपाठ आता आरटीओ कार्यालयासंबंधी 95 टक्के कामे घरबसल्या एका क्‍लिकवर करता येणे शक्‍य झाले आहे. यामुळे कार्यालयात होणारी नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे पूर्वी वाहन परवान्यासाठी दररोज 260 आणि योग्यता प्रमाणपत्रासाठी दीडशे ते दोनशे नागरिकांना शुल्क भरण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत होते. आता हा त्रास कमी झाला आहे. 

पूर्वी 

चिखली : वाहन परवान्यांच्या ऑनलाइन अपॉइंटमेंट पाठोपाठ आता आरटीओ कार्यालयासंबंधी 95 टक्के कामे घरबसल्या एका क्‍लिकवर करता येणे शक्‍य झाले आहे. यामुळे कार्यालयात होणारी नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे पूर्वी वाहन परवान्यासाठी दररोज 260 आणि योग्यता प्रमाणपत्रासाठी दीडशे ते दोनशे नागरिकांना शुल्क भरण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत होते. आता हा त्रास कमी झाला आहे. 

पूर्वी 

  • आरटीओ संबंधित कामासाठीचे शुल्क कार्यालयात जाऊन भरावे लागत होते. 
  • दुपारी दोन वाजेपर्यंतच शुल्क भरता येत होते. 
  • सकाळी दहापासूनच रांगेत उभे राहावे लागत होते.पैसे भरण्याची वेळ संपल्यावर दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागत होती. 
  • कार्यालयास सुटी असल्यास मोठा खोळंबा होत होता. 
  • नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता. 

आता 

  • आरटीओच्या कामकाजात अनेक आमूलाग्र बदल केले आहेत. 
  • वाहन परवान्याप्रमाणेच जानेवारी 2018 पासून वाहन नोंदणी, वाहनांसाठी लागणारे योग्यता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेता येते. 
  • नेट बॅंकिंगमार्फत शुल्क भरता येतात. 
  • आरटीओ कार्यालयात जाण्याची व शुल्क भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. 
  • आपल्या वेळेनुसार कधीही आणि कुठूनही नागरिक कामे करू शकतात. 

अपॉइंटमेंट देण्यावर मर्यादा 
अपॉइंटमेंट घेतली तरी त्यांची संख्या मर्यादित ठेवलेली आहे. शिकाऊ वाहन परवान्यासाठी पूर्वी दररोज 260 उमेदवारांना अपॉइंटमेंट मिळत होती. ती आता 160 उमेदवारांना मिळते. पक्का वाहन परवाना हवा असल्यास चारचाकीसाठी 92 उमेदवारांना, गिअरच्या दुचाकीसाठी 48, बिगर गिअर दुचाकीसाठी 28 आणि रिक्षांसाठी 24 उमेदवारांना अपॉइंटमेंट मिळते. पूर्वी योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी वाहनांच्या संख्येवर मर्यादा नव्हती. आता 140 वाहनांनाच अपॉइंटमेंट मिळते. 

वेटिंग मर्यादा कमी व्हावी 
एका क्‍लिकवर अपॉइंटमेंट मिळत असली, तरी प्रत्यक्ष चाचणी देण्यासाठी दोन ते अडीच महिने वाट पाहावी लागते. वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वी अपॉइंटमेंट न मिळाल्यास दोन ते तीन महिने वाहन एकाजागी उभे करून ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे अपॉइंटमेंट देताना उमेदवारांची संख्या वाढवून दोन ते तीन महिन्यांचे वेटिंग कमी करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. 

घर बसल्या घ्या अपॉइंटमेंट : पाटील 
ऑनलाइन अपॉइंटमेंट व शुल्क भरण्याच्या सुविधेमुळे नागरिकांना पैसे भरण्यासाठी आरटीओ कार्यालयात येण्याची गरज नाही. आपल्या वेळेनुसार नागरिक घरी बसून मोबाईल किंवा सायबर कॅफेमधून वाहन परवाना आणि वाहन योग्यता प्रमाणपत्रासाठी अपॉइंटमेंट घेऊ शकतात. सुटीच्या दिवशीही नागरिक आपली कामे करू शकतात. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी झाला आहे. वेटिंगची वेळ कमी होण्यासाठी काही कालावधी जाईल. त्यानंतर नागरिकांना जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले. 

Web Title: 95 percent RTO related works can be done online now