पुण्यात डीजेप्रकरणी ९८ मंडळांवर गुन्हे

पुण्यात डीजेप्रकरणी ९८ मंडळांवर गुन्हे

पुणे - उच्च न्यायालयाने डीजेला बंदी घातल्यानंतरही शहरातील अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये ‘डीजे’चा दणदणाट सुरू ठेवला. मात्र, पोलिसांनी ठोस भूमिका घेतल्यामुळे अनेकदा पोलिस व कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे प्रकार रविवार व सोमवारी पाहायला मिळाले. डीजे प्रकरणातून एका पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला आणि पुणे विघ्नहर्ता न्यासच्या मंडपात धुडगूस घालण्याचे प्रकार घडले. दरम्यान, पोलिसांनी ९८ मंडळांविरुद्ध डीजेप्रकरणी गुन्हे दाखल केले.

गणेशोत्सवामध्ये डीजे वाजविण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. त्यानुसार पोलिसांकडून गणेशोत्सवातील सातव्या व नवव्या दिवसापासूनच डीजेचा वापर करणाऱ्या मंडळांसह डीजेमालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली होती. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी ११ जणांना अटक केली होती. या कारवाईचे पडसाद मुख्य मिरवणुकीमध्ये उमटले. रविवारी सायंकाळी सहा वाजता डीजेला परवानगी नाकारल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी खडकी पोलिस ठाण्यातील कर्मचारी डी. एच. थिटे यांच्या डोक्‍यावर लोखंडी गज मारला. त्यामध्ये थिटे गंभीर जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी दोघांना अटक केली. डीजेबंदीच्या प्रकरणावरूनच रात्री पुणे विघ्नहर्ता न्यासच्या कुमठेकर रस्त्यावरील मंडपात असलेल्या खुर्च्या व अन्य साहित्य खैरेवाडीतील एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या. तसेच, न्यासच्या महिला परीक्षक व कॅमेरामनला शिवीगाळ केल्याचे डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले.

मंडळ प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी काही साउंड सिस्टिम जप्त करण्यास सुरवात केली, तरीही टिळक रस्ता व बाजीराव रस्त्यावर काही मंडळांचे डीजे वाजत होते. दरम्यान, पोलिसांनी काहीशी आक्रमक भूमिका घेत मंडळे पुढे ढकलण्यास सुरवात केली. त्यावरून पुन्हा पोलिस- कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

रविवारी रात्री साडेबारा वाजल्यानंतर बहुतांश मंडळांचे डीजे बंद झाले. त्यानंतर मंडळांनी पोलिसांच्या विरोधात निषेध नोंदविण्यास सुरवात केली. बेलबाग चौकामध्ये काही मंडळांना पोलिसांनी डीजे बंद करण्यास सांगितले. त्यामुळे एका मंडळाने चौकातच ठिय्या मांडला अन्‌ घोषणाबाजी करत पोलिसांचा निषेध नोंदविला. हा प्रकार दोन तासांहून अधिक काळ सुरू होता. 

डीजेचा त्रास थांबवा 
‘‘माझे वय ८६ वर्षे आहे. पत्नीचे वय ८१ असून, ती आजारी असते. तिला घराबाहेरदेखील पडता येत नाही. आम्ही कुमठेकर रस्त्यावर राहतो. अनंत चतुर्दशीला रस्त्यावर डीजेचा दणदणाट जोरदार होता. छातीत धडधडत होते. अखेर माझ्या पुतण्याने शंभर नंबरला दूरध्वनी करून डीजेचा त्रास थांबवा, असे पोलिसांना कळविले...’’ सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिक व्यंकटेश पाठक यांच्यासारखाच अनुभव तेथील स्थानिक नागरिक शरद जोशी, विश्‍वनाथ कोनकर यांना आला. काही नागरिकांनी डीजेच्या त्रासाला कंटाळून शंभर नंबरला कळविले. आता डीजे थांबवा, आम्हाला सहन होत नाही, अशी व्यथा त्यांनी पोलिसांकडे मांडली. जोशी म्हणाले, ‘‘माझे वय ८० तर पत्नीचे वय ७४ आहे. या आवाजामुळे घाबरायला होते. डीजेचा आवाज या वयात आम्हाला सहन होत नाही. अखेर शंभर नंबरला कळविण्याशिवाय आमच्याकडे पर्याय काय आहे? स्पिकरच्या भिंती उभारून गाण्यांवर तरुण नाचतात, तो डीजेचा आवाज माझ्या तीन-चार वर्षांच्या नातीलासुद्धा सहन होत नाही. आम्ही तिला नातेवाइकांकडे पाठवून दिले.’’    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com