
Pune Crime: सुसंस्कृत पुण्यात हुंडाबळी! २१ वर्षीय महिलेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
सुसंस्कृत पुणे हुंडाबळीच्या घटनेने हादरले आहे. पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. लग्नात हुंडा दिला नाही म्हणून सासरकडील मंडळी विवाहितेचा मानसिक छळ करत होते.
रुकय्या शहनवाज शेख वय २१ असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटने संदर्भात पिडीत रुकय्याचे वडील अल्ताफ अन्सारी यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रुकय्याचे पती आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ महिन्यांपूर्वी रुकय्याचा विवाह झाला होता. विवाहच्या काहीच दिवसात रुकय्याचा पती आणि सासू यांनी तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. लग्नामध्ये तिच्या माहेरच्या लोकांनी हुंडा दिला नाही या गोष्टीवरून तिला अनेक वेळा हिणवले गेले आणि तिचा वारंवार छळ केला जात असे.
लग्नात दिलेल्या भेट वस्तू या भेट वस्तू नसून त्या भिक घातल्या आहेत असे म्हणून रुकय्याला पती आणि सासू मिळून अनेक वेळा घालून पाडून बोलत असत. या सर्व जाचाला कंटाळून रुकय्याने तिच्या रहात्या घरी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. रुकय्याचे पती शहानवाज कासिम शेख याला पोलिसांनी अटक केली असून तिची सासू राजमा शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.